h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
श्रीगणेश लेखमाला २०१९ - प्रस्तावना
गणाधिप नमस्तुभ्यं सर्वविघ्नप्रशान्तिद | उमानंदप्रद प्राज्ञ त्राहि मां भवसागरात् ||
महाराष्ट्रातला माणूस मुळात सण-उत्सव, कला-साहित्य, नाटक, काव्य, मुलाखती यांचा अभिलाषी आहे. आपल्या गणगोतासह कुटुंब-मित्रमंडळींसह उत्तम कलांचा, साहित्याचा, काव्याचा आस्वाद घ्यावा, उत्तम नाटकांना, मैफलींना, मुलाखतींना हजेरी लावावी हे त्याला मनापासून आवडतं; कारण हे सगळे त्याचे मानबिंदू असतात. त्याच्या जगण्याचा अविभाज्य भागच म्हणा ना!
आजच्या वेगवान आयुष्याशी जुळवून घेतानाही आपल्या ह्या हौशी जपायला हाडाचा मऱ्हाठी माणूस विसरत नाही. ह्या हौशींची पूर्तता करायची त्याची परिमाणं मात्र थोडीफार बदलत गेलेली असू शकतात. उदाहरण द्यायचंच झालं, तर वेळेअभावी किंवा भारताबाहेर असल्याने त्याला हवं तेव्हा नाटक पाहायला जाता येत नसेल किंवा एखाद्या मैफलीला हजेरी लावता येत नसेल किंवा पुस्तक प्रदर्शनात हवा तेवढा वेळ रेंगाळता येत नसेल. पण म्हणून त्याच्या आयुष्यातून या गोष्टी हद्दपार होत नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर करत, त्या 'ऑनलाइन' साजऱ्या होतात. बुद्धीची कास धरत मऱ्हाठी माणूस भावभक्तीत रंगून जातो. महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाची उत्सवप्रियता आणि हौस अनमोल आहे, हेच खरं.
अशा ह्या उत्सवसोहळ्याचे तुम्ही-आम्हीदेखील हौशी पाईक आहोतच की! मिपावरसुद्धा आपण गणेशोत्सव दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. गणपतीचं आगमन आणि मिपास्थापनेचा दिवस असा आनंदोत्सवाचा दुहेरी योग असतो आणि ह्या उत्सवानिमित्त सादर होणाऱ्या लेखमालेची मिपाकर उत्सुकतेने वाट बघत असतात.
तर, आज श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही-आम्ही-सर्व मिपाकरांनी हातभार लावून साकारलेली श्रीगणेश लेखमाला २०१९ आपणां सगळ्यांपुढे सादर करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे! विविध विषयांवरचे लेख, कथा, कविता, मुक्तक, चित्रकला, दृक्-श्राव्य माध्यम वापरून सादर केलेली मुलाखत असं ह्या मालिकेचं स्वरूप आहे. गणपती म्हटला की त्याचा नैवेद्य आलाच! मिपाच्या बल्लव मंडळाने आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत, आपल्या वैयक्तिक व्यग्र दिनक्रमांतूनही मिपा गणपती हा स्वतःच्या घरचाच गणपती आहे, ह्या भावनेने पाककृती सादर केल्या आहेत. त्यांचाही लेखमालेमध्ये समावेश आहे. आता या लेखमालेवर तुम्हा वाचक मंडळींच्या पसंतीची मोहोर उमटू देत, ही त्या गजाननाच्या चरणी प्रार्थना करतो आणि ही लेखमाला तुम्हांपुढे सादर करतो.
मिपा कुटुंबातील सर्व लेखक-वाचक-सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना श्रीगणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रीगणेश तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, ह्या सदिच्छा!