h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
margin-left:10px;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:600px;
margin: auto;
}
अळूच्या वड्या
समस्त मिपाकरांना सुदृढ अन निरोगी आरोग्य लाभो, हीच श्री गणरायाचरणी प्रार्थना.
आताशी घरोघरी, मंडपात बाप्पा विराजमान झाले असतील. पाकगृहात आया-बायकांची लगबग चालू असेल. यजमान बाप्ये मंडळी आरतीच्या तयारीला लागली असतील. तीर्थप्रसाद वाटण्यासाठी पोराटोरांची लुडबुड चालू असेल. एव्हाना उकडीच्या मोदकांचा घमघमाट तुमच्याही नाकापर्यंत पोहोचलाच असेल आणि तो आता येते दहा दिवस येतच राहील. बाप्पांची तर चंगळ आहेच पर्यायाने आपलीही. गोडाधोडाच फारसं अप्रूप नसल्याने माझा ओढा मात्र तिखट-चमचमीत पदार्थांकडे जास्त आहे.
मग काय म्हणता, बाप्पाच्या प्रसादाचा मान नसला, तरी नैवेद्याच्या ताटात हक्काचं स्थान असलेल्या अळूवडीवर एखादा प्रयोग करायचा का? नाही म्हणजे तळणीच्याच करू या, पण आमच्या मातोश्री करतात तशा नारळाच्या दुधातल्या अळूवड्या करू या?
चला तर मग, लागू या तयारीला? जरा सामानाची जुळवाजुळव करून ठेवली की झटपट होतायत बघा.
♦ वडीच्या अळूची पानं किमान ८ ते १०.
गरम मसाल्याच्या वाटणासाठी ▼
♦ १ वाटी सुकं खोबरं + काळीमिरी ८-१० दाणे + खसखस १ चमचा
♦ ४-५ सुक्या लाल मिरच्या + दालचिनी १ ते १.५ इंच हे सगळं कोरडं भाजून.
♦ १ मध्यम कांदा (बारीक उभा चिरून) गुलाबी रंगावर परतून.
सारणासाठी ▼
♦ बेसन २ वाट्या
♦ तांदळाचं पीठ २ चमचे
♦ १/२ चमचा हळद
♦ धणे-जिरे पूड १ चमचा
♦ हिरवं वाटण १-२ चमचे (कोथिंबीर + हिरव्या मिरच्या)
♦ आलं-लसूण पेस्ट १-२ चमचे
♦ लाल तिखट १-२ चमचे
♦ मीठ चवीनुसार.
♦ चिंचगुळाचं पाणी लागेल तसं.
♦ २-३ चमचे मोहन
♦ १ ते १.५ नारळांचं दूध
सर्वप्रथम अळूची पानं स्वच्छ धुऊन कोरडी करून घेऊ. पानांच्या खालच्या बाजूच्या जाड शिरा कापून टाकू आणि त्यावरून लाटणंही फिरवू.
सारणाचं सामान आणि सुकं वाटण एकत्र करून त्यात बेताबेताने चिंचगुळाचं पाणी टाकत पीठ भिजवून घेऊ.
यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घेऊ. साधारण श्रीखंडाची घनता आली पाहिजे, म्हणजे पानं सारवताना सारण ओघळून बाहेर नाही येणार.
अळूचं एक एक पान घेऊन त्यावर वरील सारण नीट सारवून घेऊ. एक उलटं, दुसरं सुलटं असं करत किमान ४-५ पानं सारवू.
नंतर पानांच्या सर्व कडा आतल्या बाजूने मुडपून, त्यालाही थोडं सारण लावू.
आता आतल्या बाजूने वळवून पानांचा लोळ करू. ज्या पात्रात हे लोळ उकडायचे आहेत, त्यात खाली केळीचं पान (न मिळाल्यास एखादं सुती कापड) ठेवून रचू.
कुकरला (शिट्टी न लावता) किंवा इडली पात्रात पाणी ठेवून हे लोळ वाफवून घेऊ. एक-दोन लोळ लगेचच ३-४ मिनिटांत बाहेर काढून घेऊ. ज्या वड्या तळायच्या आहेत, त्या जरा जास्त वेळ वाफवू. (अंदाजे १०-१५ मिनिटं.)
लवकर बाहेर काढलेल्या लोळाचे थोडे मोठे अंदाजे (३/४ इंच जाडीचे) तुकडे करून घेऊ.
एका कढईत नारळाचं दूध घेऊन त्यात चवीपुरतं मीठ टाकून उकळी आणू. नंतर त्यात अळूवड्या सोडून मध्यम आचेवर दूध आटवू. वडीतल्या बेसनाच्या सारणामुळे दूध दाट व्हायला मदत होईलच.
बघा बरं, झाल्या की नाही लगेच नारळाच्या दुधातल्या अळूवड्या! हाय काय आन नाय काय.
आणि हो, बरोबर याही ताटात हव्यातच, नाही का?