h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 17px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
margin:30px;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:600px;
margin: auto;
}
div.chitra1 {
max-width:650px;
margin: auto;
}
div.chitra2 {
max-width:300px;
margin: auto;
}
त्या

त्या रोजच जातात नदीकाठावर थकल्या-ओढल्या पावलांनी
अतृप्त इच्छा, अशक्त आशा, अस्वस्थ भावना, अपुऱ्या स्वप्नांचं
भलंथोरलं गाठोडं माथ्यावर घेऊन.
त्या रोजच आपटून-धोपटून
खसाखसा घासून, खळाखळा खंगाळून, करकचून पिळून काढतात,
विरल्या-विटल्या लक्तरांतला सारा मळ,
लख्ख करतात त्यांना बिलोरी आरशासारखं,
आणि झटाझट झटकून पसरतात सारी,
वाळूवर लांबच लांब.
मग काठावरच्या घनदाट सावलीच्या वत्सल चिंचेखाली, सळसळत्या बाळसेदार पिंपळाखाली,
विसावत गातात,
हरपल्या सुखाची गाणी गवसल्या वेदनांच्या स्वरांत.
झाडांवर क्षणभर थबकून फिरून गगनभरारी घेणारी
लडिवाळ पाखरं मिळवतात आपले भारलेले स्वर या गाण्यांत,
अन्
त्या स्वरांनी जादूची कांडी फिरावी, तसे
हिरव्यागार पानजाळीतून झिरपणारे काही निरागस कवडसे,
नाचतनाचत उतरतात लक्तरांवर.
उडत्या भिरभिर पंखांची, नाचऱ्या झुरुमुरू पानांची,
हलत्या कलाबतू सावल्यांची नवलाची नक्षी मिरवत खुलतात,
मखमली, गर्भरेशमी झालेली लक्तरं,
जरतारी सोनसळी तलम पोत लेवून.
त्या हरखून उठतात, हळुवारपणे घड्या घालतात,
नव्याकोऱ्या वस्त्रांच्या ,
अन् परततात थुईथुई नाचऱ्या पावलांनी,
माथ्यावर घेऊन सांजेचं अलवार रंगखुळं आकाश.
प्रकाशचित्र: मिलन वाडकर ( कृष्णा रिव्हर कँप)