रगडा पॅटिस हा काही नवीन पदार्थ नाही. सर्वांना माहित असलेला, चाखलेलाच आहे. पण एकदा जबलपूरला माझं गाणं होतं. तिथं एक राजुरकर म्हणून कुटुंब रहात होतं त्यांच्याकडे मी खाल्लेला रगडा पॅटिस अप्रतिम होता. त्या घरच्या बाईंना मी कृती विचारून घेतली. तेव्हापासून मी तसाच करते. ती कृती तुमच्यासाठी देते.
लागणारे जिन्नस:
सात ते आठ मध्यम बटाटे, एक ईंच आल्याचा तुकडा, मूठ भरून सोललेल्या लसूण पाकळ्या, कोथिंबिरीची मोठी जुडी. एक पुदीन्याची जुडी, एक वाटी भिजलेली चवळी, दीड वाटी भिजलेले पिवळे वाटाणे. सात आठ चांगले पिकलेले टोमॅटो, दहा बारा हिरव्या मिरच्या, तिखट, हळद, धने पुड, जिरे पुड, मीठ, तेल. अर्धी वाटी चिंच, अर्धा पाव सिडलेस खजूर. वाटीभर किसलेला गूळ, मुठभर सुक्या काश्मिरी मिरच्या, बारीक शेव.
या प्रकाराची सगळी चव चटण्यांमध्ये असते. या साठी तीन वेगवेगळ्या चटण्या बनवायच्या आहेत त्याची कृती खालीलप्रमाणॆ
चटणी एक: टोमॅटो + सुक्या लाल काश्मिरी मिरच्या + लसूण
सुक्या लाल मिरच्या पाण्यात चार ते सहा तास भिजत घालाव्या, टोमॅटो कुकरमध्ये उकडून गार झाल्यावर साले काढून टाकावीत. मिरच्या, टोमॅटो आणि लसूण पाकळ्या मिक्सरवर बारीक वाटून त्यात चवीपुरते मीठ घालावे. चटणी केचपपेक्षा थोडी पातळ असावी.
चटणी दोन: चिंच +खजूर + गूळ
चिंच व खजूर भिजत घालावा दोन तास , चिंचेचा कोळ काढावा. भिजवलेल्या खजूराचे तुकडे करून घ्यावे, चिंच, खजूर, गूळ मिक्सरवर एकत्रच बारीक वाटून घावे. त्यात चवीपुरते मीठ व एक चमचा धनेपूड वाटताना घालावी. चटणी फार पातळ करू नये.
चटणी तीन कोथिंबीर + हिरव्या मिरच्या + पुदीना
कोथिंबीर व पुदीना निवडून चिरून घ्यावा, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबिर व पुदीना मिक्सरवर बारीक वाटून घ्यावा. चवीपुरते मीठ घालावे. चटणी वाटताना बेतानेच पाणी घालावे, ती वाटल्यावर पातळ होते.
रगडा: नेहमीसारखाच फक्त त्यात चवळी आणि वाटाणे दोन्ही वेगवेगळे शिजवून घ्यावे, कढईत आधी थोडे तेल त्यावर थोडी हळद व आले ठेचून घालावे. शिजलेले वाटाणे घालून चांगले रगडून मोडून घ्यावे सगळॆ वाटाणे मोडले जाऊन चांगला लगदा झाला पाहिजे. नंतर शिजलेली चवळी घालावी. त्यावर अर्था चमचा जीरे पावडर , चवीपुरते मीठ व एक चमचा धने पावडर घालावी.
पॅटिस: बटाटे उकडून्, सोलून कुस्करून घ्यावे. त्यात थोडी हळद, चवीप्रमाणे मीठ घालावे, पॅटिस वळून तव्यावर शॅलोफ्राय करून घ्यावे.
सर्व्ह करताना डिशमध्ये पॅटिस घालून वर गरम रगडा घालावा. त्या वर चिंच खजूराची चटणी घालावी त्या वर हिरवी चटणी घालावी शेवटी लाल चटणी घालून वर शेव घालावी. चटण्यांना नैसर्गिक रंग येतात आणि रंगसंगती सुरेल दिसते.