चांगला धुंवाधार पाऊस लागला की आठवण येते ती कुर्ल्यांच्या झणझणीत कालवणाची. आम्ही याला कुर्ल्यो म्हणतो कुणी चिंबोऱ्या असे म्हणतात तर शहरी मराठी भाषेत यांना म्हणतात खेकडे. मोठे काळ्या पाठीचे असावेत त्याला चव चांगली असते.
लागणारे जिन्नसः
सात ते आठ काळ्या पाठीचे कुर्ल्ये (चिंबोऱ्या)
तीन मध्यम आकाराचे कांदे, हिंग, हळद, तिखट, मीठ, लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ साधारण सहा सात चमचे , दोन चमचे गरम मसाला, आठ ते दहा लसूण पाकळ्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, पाच सहा हिरव्या मिरच्या. दोन पळ्या तेल. आणि अर्धा खोवलेला नारळ. दोन चमचे शिरका (नसेल किंवा आवडत नसेल तर चिंचेच्या कोळाचाच वापर करावा)
कुर्ल्या व्यवस्थित साफ करून घ्याव्यात. हे करताना, छोट्या नांग्या आणि मोठे नांगटे काढून वेगवेगळे ठेवावे. तळाला एक त्रिकोणी पिशवीसारखा भाग असतो तो उघडून आतली घाण काढून टाकावी. भरपूर पाणी वापरून कुर्ल्या स्वच्छ धुवून घ्याव्या. नुसत्या पाण्याने कधी कधी स्वच्छ निघत नाहीत तेंव्हा एखाद्या नारळाच्या शेंडीने घासून कुर्ल्या साफ कराव्यात. साफ केल्यावर अर्धे अर्धे तुकडे करून घ्यावेत
लसूण, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर वाटून वाटण करून घ्यावे.
कांदे चिरून दोन भागात वाटावेत त्यातील एक भाग थोड्या तेलावर परतावा कांदा शिजत आला की त्यात खोवलेले खोबरे घालून परतून घ्यावे. थंड झाल्यावर वाटून घ्यावे.
छोट्या नांग्यांमध्ये थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्याव्या. वाटल्यावर फडक्यावर किंवा गाळणीने गाळून घ्याव्या. चोथा टाकून देऊन गाळीव पाणी एका बाऊलमध्ये घ्यावे त्यात एक चमचा हळद, दोन ते तीन चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हिंग, एक चमचा मीठ, दोन मोठे चमचे चिंचेचा कोळ, लसूण-मिरची आणि कोथिंबिरीचे वाटण घालून या सर्वांची पेस्ट करावी व ती कुर्ल्यांना लाऊन अर्धा तास ठेवाव्यात
कढईत दोन पळ्या तेल घालून त्या वर उरलेला चिरलेला कांदा परतून घ्यावा कांदा परतताना त्यावर दोन तीन वेळा पाण्याचे हबके मारून गॅस बारीक ठेऊन झाकण ठेउन वाफ द्यावी. त्यात थोडा हिंग घालावा. कांदा शिजल्यावर कुर्ल्या घालाव्यात. जराशाने दोन चमचे शिरका घालावा तो नसेल तर चिंचेचा कोळ घालावा. थोडं पाणी घालावं उकळी आली की गरम मसाला घालावा. वाटलेलं कांदा खोबरं घालाव. रस्सा पाहिजे तितका होण्यासाठी पुरेसं पाणी घालाव. झाकण ठेऊन मंद गॅसवर दहा ते बारा मिनिटे शिजवून घ्यावे. कालवण तयार. शिताबरोबर, भाकरीबरोबर, किंवा चपाती वा पावाबरोबर सर्व्ह करावा.
या कालवणाने पावसाळी सर्दी खोकला पळून जातो.
गौरीबाई गोवेकर.