मी इथलीच. पूर्वीची गौरीबाई गोवेकर. किती काळ लोटला ईथं येऊन पण काळाच्या ओघात जुन्या खात्या संबंधीत माहितीचं इतकं विस्मरण झालं की ते खातं पुन्हा सुरू करता आलं नाही. म्हणून या दुसऱ्या खात्याची तजवीज केली. खानसहेबांची खिचडी, पाया सूप वगैरे माझ्या पाककृती असतील तुमच्या लक्षात. आतासुद्धा क्षितिजच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं. असो.
आज बर्याच काळानंतर पुन्हा इथं आले शुभारंभ गोडापासून करते. तर आज पाहूया पातोळ्या. आमच्या गोव्याकडचा खास पदार्थ
साहित्य:
दोन वाट्या तांदळाची बारीक दळलेली पिठी (वासाचो तांदुळ असलो तर छानच. नाहीतर साध्या तांदळाची सुद्धा चालेल)
एक मध्यम आकाराचे तवस (म्हणजे काकडी)
एक वाटी किसलेला किंवा चिरलेला गुळ
दोन चमचे साजुक तूप
दोन चमचे खसखस किंवा तीळ
चिमूटभर मीठ
सहा ते सात हळादीच्या झाडाची पाने. (मिळातात मार्केटात. मी घरीच लावली आहे. आता पावसात येतात पानं )
कृती:
काकडी धूवून साल काढून उभी दोन भागात चिरावी. आतला गर बियांसकट काढून टाकावा मग बारीक खिसणीने ती खिसावी. त्या खिसात चिमुटभर मीठ
कालवून दहा मिनिटे ठेवावे. खिसाला पाणी सुटेल त्यात दोन चमचे साजूक तूप आणि चिरलेला गूळ घालावा. गुळ विरघळला की खसखस/तीळ घालावे. मग हळूहळू तांदुळाची पिठी घालून मळावे. साधारण चपातीच्या पीठापेक्षा सैल पाहिजे.
स्टीमर/ मोदकपात्र /पातेलं+चाळणी या पैकी काहीही पाणी घालून गॅसवर चढवावी वाफ येऊ लागली की घूवून घेतलेल्या हळदीच्या पानाच्या अर्ध्या भागावर तुपाचा हात लावावा व वरील पिठाने पानावर एक ईंच जाडीचा थर देऊन ते लिंपावे. उरलेले अर्धे पान दुमडून त्याच्या वर झाकणासारखे घालावे. अशा प्रकारे सर्व पानं लिंपून घ्यावीत व पंधरा ते वीस मिनीटे चांगली वाफवून काढावीत. वाफ जरा जिरली की दुमडलेले पान उघडून पातोळी पानावरून काढून घ्यावी.
आंबट -तिखट कैरीच्या लोणच्याबरोबर किंवा नुसतेच वरून साजूक तूप घालून सर्व्ह करावीत.
(फोटू बद्दल मात्र माफी मागते. मोबाईल आहे पण नीट जमत नाही काढायला. काढला तरी इथे कसा द्यावा हा प्रश्न आहेच. कुणी बनवली तर फोटू डकवा)
गौरीबाई गोवेकर