कंटाळा आल्यावर घरच्या घरी तुम्ही काय खाता ?
मंदार भौंचा बाजार आमटीवाला धागा पाह्यला आणि डोक्यात किडा वळवळला बघा.
तुम्हाला कधी अस होत का कि लयी कंटाळा आलाय आणि घरात असलेल काहीच खावस वाटत नाही ? मला तर खुपदा होत अस.
मग काहीतरी झोलझाल करून मी नाही नाही ते खात बसतो, शाकाहारी असल्यामूळ थोडी मर्यादा येते पण काय हरकत नाही.
१) शिळा भात असला आणि तो थोडासा मोकळा असला कि त्यावर कच्च तेल टाकून + आपल्याला झेपेल इतके लाल तिखट + मीठ टाकून मस्त हाणतो, सर्दी झाली असल तर नाक मोकळ होत आणि तोंडाला चवही येते.
२) वरचाच प्रकार थोडा मोल्ड करून पोह्याला वापरायचा त्यात आवडत असल तर घरचे घट्ट दही टाकायचे कधी कधी + कोथमिर मारायची थोडी वरून. मस्त लागतंय.
३) टोमाटो भात - खूप पूर्वी आमच्याकडे एक बिगारी काम करणारी यायची (घरकामाला)पण बघता बघता आमची इतकी गट्टी झाली कि मला तीन भाऊच करून टाकला मग तिच्या माग माग कधीतरी तिच्या झोपडीत जाऊन काय काय खायचो मी ती पण प्रेमान खायला घालायची. तर तिथ त्या लोकांचा टोमाटो भात मी पाहिला आणि खाल्ला होता साधा आणि सिम्पल पण चवीला बिर्याणी बिर्याणी बिर्याणी (द अंग्रेज ची आठवण आली) च्या तोडीचा.
टम्बाटी भात :-
१ मिडीयम वाटी तांदूळ घ्या तो धुऊन निथळत ठेवा
३ मोठे टोमाटो घ्या आणि त्याचे मोठे काप करा तसेच मिडीयम २ बटाटे सालासकट घेऊन त्याचे हि मोठे काप करायचे.
पातेलीत थोडे सढळ हस्ते (मानवेल इतके) तेल घेऊन त्यात आधी सालासकट खरपूस बटाटे परतून घ्यायचे नंतर त्यात टोमाटो घालून परतून घ्यायचे नंतर झेपेल इतके तिखट + चवीला मीठ टाकून ते मिश्रण मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
आता आपला निथळत ठेवलेला तांदूळ यात टाकून २ मीन परतून घ्या आणि अंदाजाने पाणी टाकून (कोमट पाणी नायतर गार पाण्याने चव बिघडते) शिजत ठेवा.
काही वेळाने तुमचा साधा, सिम्पल टोमाटो भात तयार.
टीप - याला फोडणी लावू नये / कोथिंबीर टाकू नये/ मसाला वापरू नये
--------------------------------------
तुम्ही कंटाळा आला तर काय अतरंगी खाता ते जरूर सांगा.