खाण्यासाठी जन्म आपुला २ : बाजार आमटी खिलवणारं महावीर व्हेज

आपल्या पाककृती विभागाचा परिचय करून देतांना मालकांनी लिहिलंय "शेवटी सगळी धडपड आणि कष्ट हे सुखाच्या दोन घासांकरताच तर आहेत! मग ते दोन घास खमंग आणि चवदारच असले पाहिजेत! " अगदी खरंय म्हणा हे खाल्लेले दोन घास काअसेना, ते परिपूर्ण असले तर जेवणाला अजून लज्जत येते. खाण्यासाठी जन्म आपुला या हि उक्ती कृतीत उतरवण्याची माझी कायम धडपड असते, त्यामुळे पुण्यनगरीत आल्यापासून इथले वेगवेगळ्या चवीचे पदार्थ चाखणं मस्ट असते आणि वेगळं काय खायला मिळेल याच्या शोधात असतो. अश्याच एका फेसबुकवरच्या शोध मोहिमेत 'बाजार आमटी' या पदार्थाचं नाव ऐकलं आणि पुण्यतनगरीत हे मिळतंय म्हंटल्यावर जाऊन खाणं आलंच.

एक आटपाटनगर होतं त्या नगरातल्या थोरले माधवराव पेशवे पथावर महावीर वेज हे खास सोलापुरी चवीचे खाऊ घालणारं हॉटेल आहे. याच्या जवळची खूण सांगायची म्हणजे हे सुप्रसिद्ध अश्या 'विश्व' हॉटेल जवळ आहे आणि 'झकास निखारा मिसळ' नावाच्या अत्यंत ओव्हररेटेड मिसळ दुकानाला लागून आहे. (आता तुम्हाला विश्व हॉटेल माहिती नसेल तर तुम्ही पुण्यातल्या पारपत्राचा पुनर्विचार करणे हे योग्य). असो तर परवा बदाबदा पाऊस पडत असतांना सुद्धा इथे गेलो, अगदी साधी पण सुंदर रचना असलेल्या या जागेत आत गेल्यावर मेन्यूकार्ड कडे न पाहता 'बाजार आमटी' आणि ज्वारीच्या भाकरीची ऑर्डर दिली, त्यांनी विचारलं "कडक कि नरम ?" जास्त काही माहिती नसल्याने रिस्क न घेता नरम भाकरी सांगितली आणि DRS चा रिव्यू बरोबर ठरल्यावर धोनीला जेव्हढा आनंद होत नसेल त्या पेक्षा जास्त आनंद मला झाला. पुढे ऑर्डर दिल्यावर आमच्या त्या बाबूमोशाय ने शुन्य मिनिटांत, हल्ली पुण्यनगरीतल्या हाटेलात दुर्मिळ होत चाललेला अगदी नजाकतीने कापलेल्या पातळ गोल कांद्याच्या चकत्या कांदा, रसरशीत लिंबू आणि थंडगार काकडीचा साज आणून दिला. तुम्हांला सांगतो राजेहो ते पाहून दिल अगदी खुश झालं .

थोड्याच वेळात मुख्य डिश बाजार आमटी आणि भाकरी झाली. झाडाचं मूळ आणि ऋषीचं कुल विचारू नये असं म्हणतात (चूभूदेघे) पण खाद्यपदार्थांच्या बाबतीत असं कोणी काहीही म्हंटलं नसल्यामुळे आपली डिश येईस्तोर मालकांशी गप्पा मारल्या त्यातून या आमटीचा इतिहास भूगोल आणि वर्तमाना सहित सगळा कुलवृत्तांत काढून घेतला पंढरपूर तालुक्यातल्या करकंब गावचं हे अपत्य. पूर्वीच्या काळी व्यापारी दूरवर व्यापाराला जात करकंब ला त्यांचा मध्यवर्ती मुक्काम असे. आता ते पडले व्यापारी त्यांना व्यापार करणं माहिती रांधण्याच्या नावाने बोंब, त्यामुळे दूरच्या देशात गेल्यावर त्यांची खाण्याची आबाळ होऊ लागली त्यांना प्रश्न पडला आता करावं तरी काय ? कारण त्यांना फक्त भाकऱ्या बडवता यायच्या मग त्यांच्यातल्या एका हुशार गड्याने रात्रीच्या जेवणाला मिक्स डाळींची बाजार आमटी बनवली. आजही थंडी, पडसं या साठी हि आमटी जालीम उपाय म्हणून वापरली जाते असंही सांगितलं, तेव्हा कुठे मला ठाऊक होतं कि पुढच्या काही मिनिटांतच याचा मला याची देही याची डोळा प्रत्यय येणार आहे म्हणून!

तेवढयात गरमागरम बाजार आमटी आणि भाकरी आली. ती चुरून त्यावर मनसोक्त आमटी टाकून रामकृष्णहरी केलं म्हणता म्हणता एक भाकरी संपली पण दुसरी भाकरी थंड झाल्याने ते बदलून देतो म्हणाले. तेवढ्या वेळात आमटीची नुसती चव चाखावी म्हणून एक भुरका मारला आणि PUBG मधल्या KAR ९८ स्नायपर बंदुकीचा बार उडावा तशी किक बसली. भर पावसात कानाच्या पाळया गरम झाल्या, नाकाच्या शेंड्यावर घाम दाटला.
अहाहाहाहा ! काय जबरदस्त चव होती म्हणून सांगू म्हाराजा. अगदी परफ़ेक्ट प्रमाणात मसालेदार तिखट यांचं मिश्रण. हे झाल्यावर अश्याच अजून ०२ भाकऱ्या हाणून पोटाचा विठोबा शांत केला.

मालकांना इतकं सुंदर जेवण बनवल्याबद्दल "अन्नदाता सुखी भव' म्हणून बिल आणि दुवा दिल्या. आता इतकं भारी जेवण झाल्यावर तितकंच भारी पान हवंच, त्यामुळे गाडी बुद्धिबळाच्या पटावर तिरक्या चालणाऱ्या उंटासारखी खरंच तिरक्या दिशेने घालून थेट अक्षरधारा च्या शेजारी असणाऱ्या जवाहर ला घातली. तिथलं अगदी प्रमाणात सगळं मटेरियल घातलेलं बिना तंबाखू साधा फुलचंद पान खाल्ल्यावर जी काही ब्रम्हानंदी टाळी लागली ती म्हणजे अवर्णनीय. पुणे सध्या जागतिक शहर म्हणून उदयाला येतंय जगभरचे क्युझिन चुटकीसरशी उपलब्ध होत चालले आहेत. पंजाबी, दाक्षिणात्य पदार्थांच्या भाडीमारात आपली अस्सल महाराष्ट्रीयन चव कुठे तरी हरवत चालली आहे नेहमी वाटायचं. पण इथे जळून आल्यावर हा भ्रम दूर झाला. तेव्हा मंडळी करकंबचे तरुण तडफदार उद्योजक संतोष पिंपळे आणि राहुल पुरवत यांनी सुरु केलेलं हे हॉटेल पुन्हा पुन्हा भेट द्यावी असंच आहे.

ता.क : ज्यांना मसालेदार पदार्थ सोसत नाही त्यांना सोबत घेऊन जाऊ नका जेवणाचा सगळा मुड घालवून बसाल.

ता.क. : ऐनवेळेस फोन ने दगा दिल्याने फोटो काढले नाहीत.