पुणे जसं जसं वाढत चाललं आहे तसं तसं खाण्याच्या बाबतीत हि ग्लोबल होत जाते आहे. आधी इडली डोसा सारखे दाक्षिणात्य पदार्थ म्हंटल की लोकांच्या तोंडी रुपाली-वैशाली-वाडेश्वर हि नाव यायची, आता अपसाऊथ, सांबार, अण्णाज इडली वगैरे साऊथ इंडियन पदार्थ खाऊ घालण्याच्या नावाखाली चकचकीत रेस्टॉरंट आली. पण या सर्वात एक कमी होती ती म्हणजे या पैकी एकही जण धड चवीचा 'लोणी स्पंज डोसा' देऊ शकत नव्हतं. फक्त या ठिकाणीच नाही तर पुण्यात इतरही ठिकाणी हातगाडीवर सुद्धा लोणी स्पंज च्या नावाने कोरडे ठक्क छोटे छोटे डोसे देतात, ज्यात ना धड लोणी लावलं असतं ना भाजीत मिठ.
त्यामुळे खरा लोणी स्पंज डोसा खायला आता कोल्हापूरात नाहीतर दावणगिरी ला जावं लागतं की काय अशी परिस्थिती होती. पण सुदैवाने बालगंधर्व च्या बाजूला असणाऱ्या जोशी वडेवाल्यांच्या गल्लीत 'साई दावणगिरी डोसा' सेंटर ने तशी वेळ येवू दिली नाही. लोणी स्पंज डोसा कसा असावा हे जर खरचं टेस्ट करायचं असेल तर इथे भेट द्यायलाच हवी. आपल्या डोळ्यांसमोर तयार होणारा लुसलुशीत डोसा, त्यावर हयगय न करता टाकलेलं लोणी, सोबतीला चविष्ट अशी बटाटा भाजी, ओल्या नारळाची आणि लाल चटणी. आहाहा ! तिन डोस्यात हमखास पोट भरणार म्हणजे भरणारच. यातले तीन डोसे जर पिळले तर 50 ग्रॅम तरी लोणी सहज निघेल. दावणगिरी चा डोसा तर इथली खासियत आहेच पण पुण्यात सहसा न मिळणारी गरमागरम वाफवलेली 'तट्टे इडली' पण एकदम खतरनाक भारी आहे. किंमत म्हणाल तर अगदी खिशाला परवडणारी अशी आहे.
;- खादाडखाऊ मंदार