झुंबर

आकाश कंदील मला फार आवडतो.
दिवाळीचे दिवस,तो सुखद गारवा,ती तिन्हिसांज आणि कंदिलाच्या रंगीबेरंगी कागदातून पाझरणारा सौम्य शांत प्रकाश. वाऱ्याबरोबर सळसळणाऱ्या त्या लांब लांब झिरमिळ्या. अहाहा! कित्ती आनंददायी अनुभव!
दिवाळीचे चार दिवस भुर्रकन उडतात. कंदील उतरवायची कल्पनासुद्धा मला नकोशी वाटते. मग म्हणायचं, काय घाई आहे, देवदिवाळी झाली की काढूया! पण देव दिवाळी नंतर काय कारण शोधायचं? पण इच्छा तिथे मार्ग.
मला कारण सापडलं. नाताळ ते इंग्रजी नव वर्षदिन म्हणजे, स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणे परदेशस्थ भारतीयांचे मायदेशी परतण्याचे दिवस! साहजिकच परदेशी असलेला लेक येइपर्यंत असू दे म्हटलं कंदील! शिवाय साधु संत येती घराच्या चालीवर...मुलं बाळं येती घरा,तोचि दिवाळी दसरा....नाही का? मी माझ्यावरच खूष झाले.
पण १ जानेवारीही गेला. माझा आकाश कंदील जमिनीवर उतरला. त्या रिकाम्या जागेकडे बघून फार उदास वाटू लागलं. विचारचक्र फिरत राहिलं. काहीतरी करण्यासाठी बोटं शिवशिवू लागली. कचऱ्यातून कला की कलेतून कचरा यावरून नेहमीच टोमणे ऐकावे लागतात.(कलेचा कचरा खूपच असतो हे गुपचुप कबूल करायला हरकत नाही)असो, तर मग ठरलं की ’लेफ्ट ओव्हर रेसिपिज’प्रमाणे उरल्या सुरल्या कला सामानातूनच काहितरी करायचं आणि क्विलींगच्या पट्ट्या, दोरे, मणी, टिकल्या वापरून तयार झालं हे झुंबर.............

k1

k2

आकाशदिव्याची जागा झुंबराने सजली. पुन्हा एकदा कोणत्याही ऋतूमासातली तिन्हीसांज आणि पश्चिमवारा मला आता तीच अनुभूती देणार होता.