सुरनोळे

लागणारे जिन्नस:

कलिंगडाच्या सालीचा आतील पांढरा गर - १ वाटी
तांदूळ - १वाटी
चिरलेला गूळ - २ टेस्पू
खवलेले खोबरे - साधारण पाव वाटी, थोडे कमी असले तरीही चालेल.
चवीप्रमाणे मीठ

क्रमवार पाककृती: 

पूर्वी आज्जी असताना काही अगदी टिपिकल पाकृ ती बनवत असे. कलिंगड आणले की एकदा तरी हे सुरनोळे बनत असत. एकदा कलिंगड आणले होते, तेव्हां ही पाकृ आठवली. नीटशी आठवेना म्हणून रसचंद्रिका ह्या पुस्तकाचाही आसरा घेतला. साधारण तशीच कृती पुस्तकातही दिलेली आहे.

तर, ही कृती -

१. एक वाटी तांदूळ ४-५ तास भिजत ठेवावे. सकाळी तांदूळ भिजत घातले की धिरड्यासाठीचे पीठ संध्याकाळी वाटता येईल.

२. कलिंगडाच्या सालीच्या आतील पांढरा गर काढून घेऊन अगदी बारीक चिरावा वा किसणीवर किसून घ्यावा. हा गर कापून घेताना अगदी सालीलगत कापू नये, तसे कापले की हिरव्या सालीचा कडूसरपणाही त्या गरात उतरेल आणि मग धिरडी कडू व्हायची शक्यता असते.

३. वाटताना, कलिंगडाचा गर, तांदूळ व ताजे खोबरे एकत्र वाटावे. त्यात गूळ घालावा व रात्रभर पीठ झाकून ठेवावे.

४. डोश्यासाठी पीठ असते तसे सरसरीत करावे. वाटताना खूप पाणी घालायची गरज नसते, कारण कलिंगडाच्या गरालाही भरपूर पाणी सुटते. ते वापरावे व नंतर गरजेप्रमाणे पाणी घालावे. चवीपुरते मीठ घालावे.

५. दुसर्‍या दिवशी धिरडी काढावी.

वाढणी/प्रमाण: २-३ जणांसाठी

अधिक टिपा: 

गूळ घालून गोडसर बनवतात तसेच आले, हिरवी मिरची घालून तिखटही बनवता येईल.

रसचंद्रिकामधील टिपा -

१. थंडीच्या दिवसांत अर्धा कप दूध व अर्धा कप ताक मिश्रणात घालावे.
२. याचप्रमाणे काकडीची धिरडी बनवता येतात.

माहितीचा स्रोत: 

पारंपारिक व रसचंद्रिका हे पुस्तक.

मैत्रिणींकडून मिळालेल्या टिपा -

१. ज्वारीचं पीठ एक मोठा चमचा, बेसन एक लहान चमचा, तिखट, मीठ, लसूण कुटून, तीळ आणि थोडा गुळ मिक्स करुन, किसलेले कलिंगड / काकडी टाकून भिजवायचं. भाकरी थापतो तसं पीठ लावून थापायचं आणि तेल लावून भाजायचं. दही, ठेचा, शेंगदाण्याची चटणी, लोण्यासोबत खायचं. 

२. सालीच्या गराची पीठ पेरून भाजी पण अप्रतिम होते. कृती खास नाही. हिंग हळद मोहरीच्या फोडणीवर आधी गर परतून घ्यायचा. मग तिखट मीठ घालून वाफ काढायची. शिजल्यावर बेसन घालून परत वाफ आणायची.

वर भरपूर कोथिंबीर पेरायची. फारच मस्त होते. नागपूरकडे उन्हाळ्यात खूपदा होते. बहुतेक लसणाची फोडणी करतात.

३. पांढऱ्या गराची फोडी करून दुध्यासारखीही करता येते भाजी मूगडाळ वगैरे घालून. पाणीदार असल्यामुळे अवियलमधेही खपून जावं.

सगळ्यात शेवटचं: फोटो नाहीयेत. बिना फोटोंची पाककृती गोड मानून घ्या, अशी विनंती.