[शशक' १९] - एकतीस

चिमाजीअप्पा भलतेच खूष होते. बऱ्याच दिवसांनी कंबरेच्या चामडी पट्ट्याची खरेदी करण्यास निघाले. गेली सतत सात वर्षे पोटाच्या उजव्या बाजूचे दुखणे सहन करीत शेवटी महागडी शस्त्रक्रिया करून उजवे मूत्रपिंड व ऍपेंडिक्स काढून घेतले. दुखण्यापोटी बरेच बुवा, साधू, गंडे, गुरु, तांत्रिक, मांत्रिक, वैद्य, डॉक्टर झाले होते. खिशाला चांगलाच चुना लागला पण पोटदुखी आता शस्त्रक्रियेनंतर थांबली होती. आता वेळ खिसेदुखीची होती.

पट्ट्याच्या दुकानदाराने कंबरेचे माप विचारले.

"एकतीस."

चिमाजींच्या तुंदिल शरीरयष्टीकडे पाहत व अनावर हास्य दाबत दुकानदार गंभीर चेहऱ्याने म्हणाले, "राव, एकतीसचा पट्टा तुमच्या स्थूल कंबरेला करकचून वेटाळल्याने तुमच्या खालून तिसऱ्या मणक्यावर दाब पडून सततची पोटदुखी नाही का होणार? अडतीसचा घ्या, त्याच किंमतीला देतो."