एकमेकांशी कधीही पटवून न घेणारे आज्जी-आजोबा बऱ्याच वर्षांनी दोघेच तिरुपतीला गेले होते.
दर्शनानंतर मंदिरातून कॉटेजला परतताना दमलेल्या आजोबांना जायचे होते रिक्षाने. तरीपण आज्जी चढल्या भरलेल्या बसमधे. आजोबांनाही मग चढावे लागले पाठोपाठ.
"दहा रुपयांसाठी मला पळवलेस! दळभद्री कुठली..."
आजोबांची वटवट जी सुरु झाली ती काही थांबेना. वैतागून आज्जी दुसऱ्या सीटवर जाऊन बसल्या.
आजोबांची बडबड अखंड चालूच होती, पण बसमधे बाकी कुणाला काही समजत नव्हते.
आज्जी दुर्लक्ष करून खिडकी बाहेर पाहात राहिल्या.
अचानक एक मराठी माणूस पुढे आला.
"अहो आजोबा त्यांना मराठी समजत नसेल, कशाला उगाच ओरडताय"
हे ऐकताच आज्जी खुदुखुदू हसू लागल्या आणि मग आजोबाही - "अहो ती माझी बायको आहे..."