[शशक' १९] - दखल

तो जितक्या वेळा समोरून जाईल तितक्या वेळा अपेक्षेने त्याच्याकडे बघणारी ती. ओळख वाढवण्यासाठी कळेल ना कळेल असा प्रयत्न करणारी.
जगातल्या घडामोडींची काडीचीही फिकीर न करता कायम स्वतःमध्ये रमलेला तो.
तरीही प्रत्येक वेळी आज काहीतरी प्रगती होईल अशी आशा करत राहणारी ती.

पण आजचा दिवस बहुतेक वेगळा असावा.
आजसुद्धा आधी त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून बघून तिच्याकडे दुर्लक्षच केलं. पण मग एका क्षणी हळूच त्याने तिच्या नजरेला नजर दिली. काही सेकंदांसाठी त्याच्या नजरेत ओळख दिसली. ती मिटलीसुद्धा लगेच. पण तरीही तिला आनंद देऊन गेली.

कारण आज त्याच्या ऑटिझमवर मात करून तिच्यातल्या आजीने एका महिन्याने का होईना, त्याला तिची दखल घ्यायला भाग पाडलं होतं......