[शशक' १९] - पैशाचा धूर

पैशाचा धूर निघतो माझ्या बंगल्यातुन. दिसतो सगळ्यांना, पण त्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत नाहि कोणाची. सरकारी यंत्रणेत योग्य ठिकाणी तेलपाणी, आमच्या कम्युनिटी लॉबीचा सपोर्ट, आणि रक्तातच असलेला बिझनेस सेन्स... असा मी स्वाभावीक बिझनेस बादशाह.
पौण्ड्स ते दिनार अशा सगळ्या करन्सीची गंगाजळी आहे माझ्या बुडाशी. सोनं-चांदी, हिरे-जडजवाहर, ह्युमन ट्रॅफिकींग, हत्यारं, दारुगोळा, असं सगळं करतो मी. माझ्याच धंद्याचं हीत सांभाळणारी आमची बँक आहे. धंद्यातल्या आत-बाहेरच्या सर्व बातम्या माझ्यापर्यंत पोचवणारे, जणु माझ्या देहाचे अवयव असल्यासारखे एकनिष्ठ
असे मॅनेजर्स आणि एजण्ट्स आहेत.
नुकतच एक मोठ्ठं डील फायनल केलय. मॅनेजरचा निरोप येईलच इतक्यात.
तिकडे आणखी एक दुसराच निरोप गेला... "महाराज, सुरत मारलीयाने अगणीत द्रव्य मिळेल".