[शशक' १९] - व्हॅलेंटाईन इव्हिनिंग

कितीतरी दिवस सोफिया सरळच पडून राहायची.
ऊन तिला सहन व्हायचं नाही आणि रात्री कधीकधी तर पायही वाकडे व्हायचे.

आज व्हॅलेंटाईन डे.
तो आज येणार अशी कुजबुज तिच्या कानी पडली होती.
याच दिवसाची वाट बघत तिनं कितीतरी रात्री एकटीनं काढल्या होत्या.
आज मात्र तो येऊच नये असं तिला मनोमन वाटत होतं.

अखेर तो आलाच.
लिलीची पांढरी फुलं घेऊन!!!

तिनं घट्ट मिठी मारत विचारलं, "दुखलं?"

तो: "...हो.
थोडंसं....छातीत.

...व्हेंटिलेटर बंद केला तेव्हां."

त्याच्या नवीन सुटावर तिचे अश्रू ओघळले.
त्यांच्या लग्नाच्या दिवशी ओघळले होते तसे...

----------------------------------------------
सोफियाच्या थडग्याशेजारी असलेल्या त्याच्या थडग्यावर मजकूर लिहून पेंटर उभा राहिला.

विल्सन स्मिथ
मृत्यू: १४ फेब्रुवारी २०१९
RIP