आठवणी उलगडून बसतो,
तुझे फोटो पाहताना
अन हात थरथरतात,
जुने मेसेजेस वाचताना
फोटोज डिलीट करताना,
उसवलेल्या जाणिवांना जपताना,
तुझा नंबर ब्लॉक करतो,
नंबर पाठ असताना
तुझ्या आठवणींच्या रोपट्याचा
वटवृक्ष झालेला असतो
मी त्या वटवृक्षाखाली
का बरं फुलं शोधत बसतो?
मी गॅलरीतून बघतो
नभी ढग मोजतो
परत एकदा कॉफी प्यावी
म्हणून किचनकडे वळतो
मी फ्रिजचा दरवाजा उघडतो
तुला डोळे भरून बघतो
तुझ्या डोळ्यांभोवती जमलेल्या बर्फाला
हलकेच काढून टाकतो
तुझ्या बोटातली अंगठी काढतो
तुझा हात हातात घेतो
अशीच अवघडून राहशील का?
असं स्वतःलाच विचारतो.
मी जुन्या बाजारातून फ्रिज विकत घेतला, त्या फ्रिजच्या आतमध्ये चोळाबोळा केलेला कागद सापडला, त्यावर ही कविता लिहिलेली होती.