[शशक' १९] - प्राक्तन

"या; काय हवंय ? "
"चहा?"
"नको"
"कॉफी?"
"नको मला तू पाहिजे"
"काय ?"
"हो आदेश आलाय"
"कोणाचा ?"
"आज संध्याकाळी तू या खुर्चीतच शेवटचा श्वास घेशील. "
त्याला घाम फुटला त्यांन मागं वळून घंटी वाजवली. समोर बघतो तर कुणीच नाही.

संध्याकाळपर्यंत गिऱ्हाईकांच्या वर्दळीत तो सगळं विसरला .
"ए चल, काय असेल ते काढ"
"अहो हे काय चाललंय? "
"कोण तुम्ही ?"
"ए चल बाहेर ये , भाईला प्रश्न विचारतो ? ".
"अरे अरे माझा शर्ट"

"भाई बसा भाई"
भाई खुर्चीत बसला. हातातल्या चाकू टेबलवर खुपसला. गल्ल्यात हात घालून नोटा बाहेर काढल्या.
दुसऱ्या क्षणी एक अस्फुट किंकाळी भाईंच्या तोंडून बाहेर पडली आणि छातीवर हात ठेवत वेडंवाकडं मटकूळं करत तो खुर्चीतच कोसळला .