[शशक' १९] - निरोप

हातातली तीन नाणी सावरत तिने होस्टेलच्या सार्वजनिक फोनवरून एक नंबर फिरवला. चक्क रॉंङ्ग नंबर! दोनदा!! आपल्या खंद्या स्मरणशक्तीने दगा दिल्याचे दुःख पचवून १९८ फिरवला. नाव पत्ता सांगून नंबर मिळवला. नाणं परत आलं. मैत्रिणीच्या शेजारच्यांनी तत्परतेने तिच्या घराची बेल वाजवली. फोन घेतला तिच्या नवऱ्याने. सांगितला निरोप - तिच्या गाइडनी आज दुपारी साडेबारा वाजता बोलावलंय. तीनही नाणी गेली.
दुपारी मेसमधे जेवून मग ती विभागात डोकावली.
"सर, आली होती का माधवी?"
" हो. आज तसं ठरलं नव्हतं, पण बरं झालं. मी मागवलेलं पुस्तक सकाळीच आलं ते देता आलं तिला."
" अरे वा, छान छान."
सरांच्या खोलीतून बाहेर पडताना स्वतःच एप्रिल फूल झाल्याचं दुःख दाटून आलं.