नेहमी वेंधळेपणा करतो म्हणे! एखाद्या वेळेस चावी किंवा ग्रोसरी गाडीत राहिली म्हणुन लगेच?
त्याने आठवणीने गाडी रिवर्स लावली, वायपर्स उभे करुन ठेवले. शॉवेल आणि ब्रश ट्रंकमधुन घेताना त्याला मागच्या वेळची फजिती आठवली. दोन फुट बर्फ आणि हत्यारं सगळी गाडीच्या ट्रंकेत!
रात्रभरात गुडघ्याइतका बर्फ पडला होता. अर्धा तास आधीच उठुन समीर खाली गेला.
गाडी स्टार्ट करुन ठेवावी का? एक्झॉस्ट बर्फात ब्लॉक्ड असेल. मागे एकाच्या गाडीत कार्बनमोनॉक्साइड पसरुन गुदमरुन गेला. नकोच, त्यापेक्षा आधी चाकं मोकळी करु.
अर्ध्या तासानं तिन्ही बाजूचा बर्फ मनासारखा साफ झाल्यावर समीरनं खिशातुन चावी काढुन गाडी अन्लॉक केली.
नेहमीचा टुकटुक आवाज आला आणि शेजारच्या बर्फाच्या डोंगराखालुन चार दिवे लुकलुकले!