परप्रांतीयांचे लोंढे येतच होते. मुजोर राज्यकर्त्यांच्या अमानुष अत्याचारांना बळी पडलेल्या त्या लोकांना हे शांतताप्रिय राज्य खुणावत होतं. त्या लोंढ्याबरोबर आलेल्या, अनेक दिवसांच्या प्रवासाने शिणलेल्या, त्या झोपलेल्या किडकिडीत मुलाला सैनिकाने उठवलं.
‘कोण रे तू? कुठून आलास? तुझे आई आणि वडील कुठे आहेत?’
तो दचकून जागा झाला. प्रवासात सहस्रवेळा त्याच्या आई आणि वडिलांची चौकशी लोकांनी केली होती आणि दर वेळी नको नको वाटत असतानाही, त्यांच्या झालेल्या अपमानाचा, छळाचा आणि खुनाचा तो काळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता!
दूरवर दिसणाऱ्या तक्षशिला विद्यापीठाकडे पाहत तो म्हणाला, ‘मी विष्णुगुप्त चाणक्य. मगध प्रांतातल्या चणकपुरीतून इथे शिक्षणासाठी आलो आहे.’ आता त्याच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्नं तरळत होती.