[शशक' १९] - शिक्षा

"आई माझ्याकडून कपबशी फुटली. . उठताना चुकून धक्का लागला. मला शिक्षा दे." सात वर्षाचा मोगु आईला सांगत होता.
समजूतदार आई मनाशी हसली. " बाळा चूक झालीये ना. त्याची शिक्षा हवीच. तूच ठरव शिक्षा काय घ्यायची ते. तू शहाणा आहेस"
" मी दहा मिनीटे कोपर्‍यात अंगठे धरून उभा रहातो"
"ठीक आहे. तुला योग्य वाटतय ना " मोगु अंगठे धरुन उभा राहिला. आई अभिमानाने स्वतःशीच हसली.
घाईघाईत कपाटात ग्लास ठेवताना तो घरंगळला. ओट्यावर पडून फुटला.
समजूतदार आई मोगूला म्हणाली " बाळा आता चूक माझ्याकडून झाली काय शिक्षा देतोस सांग"
" अगं आई ते तू चुकून झालं . मुद्दाम होऊन थोडंच केलंस. चुकून झालं त्याला शिक्षा कशाला ? "
समजूतदार आईचे डोळे भरून आले.