[शशक' १९] - वस्तरा

रणरणत्या दुपारी, उन्हाच्या झळा बसत होत्या. फुफाटा आसमंतात उडाला होता.
"सुन्या अरे ये सुन्या चल लवकर, शाली वरल्या माळाकड चाललीये. आज नक्की गठल बघ"
ब्रश खाली ठेऊन सुनील वस्तराच हातात घेणार होता इतक्यात दिपकच्या हाळीने तो चमकला
"आँ "
"अरे आँ काय करतोय चल लवकर, काय फटाकडी दिसून ऱ्हायली आज शाली, कहरच "
"अरे संपत" सुनील चाचरत बोलला.
" कोण संप्या, त्यो शालीचा भाऊ? त्याला काय घाबरतोय? मी बघून घेईन त्याला. तू आटप "

इतक्यात छातीवर अंथरलेल्या कळकट्या रुमालाने गिऱ्हाईकाने दाढीचा फेस पुसला. अन बाकड्यावरचा वस्तरा उचलला.
तसा पहिला वार सुनीलवर केला, आणि दिपककडे मोर्चा वळवला.
हादरलेला दिपक चाचरत एवढंच बोलू शकला,
"संपतराव तुम्ही?"