[शशक' १९] - ढवळाढवळ

टीडिंग...फोन वाजला, व्हॉट्सॲपचा कस्टम टोन असल्याने तो संपदाचा मेसेज असल्याचे आशिषच्या लक्षात आले.

दुसऱ्या दिवशी परतण्याच्या बोलीवर, आईच्या वाढदिवसानिमित्त ऑफिसमधून परस्पर माहेरी गेलेल्या संपदाने तब्बल अठरा दिवसांनी काय मेसेज पाठवला असेल हा विचार करत आशिषने मेसेज वाचला.

“तुला वेळ असेल तर थोडं बोलायचं होतं”

हनिमूनला गेलेल्या दिवसापासून आशिषच्या सासूने सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री मेसेज / फोन करून दोघांच्या वैवाहिक जीवनात अक्षम्य ढवळाढवळ करून त्यांचे आयुष्य निरस करून टाकले होते. प्रेमविवाहाला तीन वर्षे उलटूनही बायकोचा खूपच कमी सहवास लाभल्यामुळे उद्विग्न मन:स्थितीतल्या आशिषला संताप अनावर होऊन त्याने उत्तर टाईप केले,

“माझ्याकडे आता बोलण्यासारखे काही नाही.
घटस्फोटाची नोटीस पाठवणार आहे.
माहेरीच खुश रहा”