[शशक' १९] - निरागस

सकाळची लगबग. ससुल्याला प्रांगणला पाठवायची व तिला ऑफीसला पळायची घाई. केवळ दीड वर्षाच्या, शांत झोपलेल्या पोटच्या गोळ्याला तिने पापे घेऊन उठवलं. त्याचं आवरायला सुरुवात केली. मनात विचार. डबा रोज संपलेला असतो म्हणजे नीट जेवत असणार, रोज हसून बाय करतो म्हणजे त्याला पाळणाघर आवडलंय. महिनाभरापासून लागलेल्या अपराधीपणाच्या बोचणीतून सुटका होणार या समाधानाने तिने नि:श्वास सोडला. कपडे घालताना तो तिला बिलगू लागला. तिच्या अंगावर रेलू लागला. तिलाही ते हवं होतं पण घड्याळाकडे बघून तिने मन आवरलं. रिक्षाचा आवाज येताच तो रिक्षापाशी चालत गेला, आणि मागे वळून म्हणाला “आई! मी पांगनमदे तुदी वात बगून येतो. बाय!” आणि ती आसवांच्या पडद्याआडून हात हलवत राहिली..........