[शशक' १९] - ऑर्डर

टिंग! मोबाइलवरचा गेम थांबवून त्याने कंप्युटरच्या स्क्रीनकडे पाहिलं. अजून एक ऑर्डर. बाहेर महामूर पाऊस आणि त्यात या ऑर्डरी. स्क्रीनवर पोरांच्या लोकेशन्स पाहिल्या आणि त्याने एक शिवी हासडली. सगळी पोरं बाहेर अडकली होती. वेळेत ऑर्डर पूर्ण करायची तर त्यालाच जावं लागणार. बायकोच्या माहेरी सांगायला फक्त टिम लीडर...
तसं आधी बरं चाललं होतं. पण काही महिन्यांपूर्वी प्रोसेस सायकल टाइम, रिसोर्स ऑप्टिमायझेशन वगैरे भानगड सुरू झाली आणि बॉसने पोरं कमी केली. हल्ली कधीकधी त्यालापण बाहेर पडावं लागे. तो मेला सिक्स सिग्मावाला बॉसला भेटल्यापासून वाट लागली होती. तोच गेला होता आणायला. पण काय साला गाडी होती त्याची, नाहीतर आपण! तंद्रीतच त्याने रेड्याचा कान पिळला.