नित्यनेमाप्रमाणे उमाजीशेठ दर्शनाला देवळात घुसला. हनुमानाच्या मुर्तीकडे त्याने डोळे विस्फारुन पाहीले. मुर्तीचा चेहरा काळवंडलेला. गालावरुन थेंब ओघळत होते.
”मारुतराया, का घाम फुटला तुला? नको कोपू रे गावावर.” तो ढसढसा रडायला लागला.
गावात वार्यासारखी बातमी पसरली. सगळे गावकरी देवळासमोर जमले. लोक कुजबुजू लागले.
“अनाचार माजलाय. त्या येडीला कॉणीतरी पोटुशी ठिवलंय.”
“गुरवाची म्हतारी सुनंला लय तरास देतीय.”
“कार्ट्यांनी वानरांना दगडी मारल्या असतील.”
सरपंचांनी हात जोडले.”बजरंगराया, आंवदा हनुमानजयंती दणक्यात करतो”.
तेव्ह्ढयात गुरवाने गण्याला कान धरून देवळात आणले आणि खडसावले “गण्या, सकाळीसकाळी काय केलं सांग.वाह्यात कार्टं!”
गण्या काकुळतीने म्हणाला.“म्या पणतीतलं तेल देवाला वाह्यलं.माहा इंग्रजीचा पेपर हाये आज.”
उमाजीशेठ कांडावून पळाला .