DIY - मोबाइल चार्जर एक्सटेन्शन वायर

DIY - मोबाइल चार्जर एक्सटेन्शन वायर

गाभा : मोबाइल चार्जरला जोडून आलेली वायर फारच तोकडी असते. चार्जिंगच्या मेन्स सॅाकेटजवळच फोन ठेवावा/धरावा लागतो. रेल्वेमध्ये आता खिडकीजवळ चार्जिंग पॅाइंट दिलेला असतो त्याचा उपयोग फक्त जवळच्या प्रवाशास होतो. एकाचवेळी दोनजणांना पॅाइंट वापरायचा झाल्यास अडॅप्टर लागतो.
ही वायर बाजारात तयार मिळत नाही.
तर त्यासाठी एक्सटेन्शन वायर बनवायची आहे.

कृतीसाठी लागणाऱ्या वस्तू :
- तीन मिटर केबल दोन वायरसवाली ( अर्थिंग असणाऱ्या तिसऱ्या वायरची गरज नाही.)
- टुपिनचे एक सॅाकेट (एक नग)
- थ्रीपिन मेन्स अडॅप्टर (एक नग)
- इन वायर ओनओफ स्विच (एक नग)

लागणारा वेळ : एक तास

कृतीसाठी थोडे वायरिंगचे ज्ञान हवेच.

इथे फोटो (१) मध्ये दाखवल्याप्रमाणे अडॅप्टर, स्विच, टुपिन सॅाकेट जोडायचे आहे. दिलेल्या वायरचे एक आणि दोन मिटर लांब तुकडे केल्यावर त्यापैकी कोणत्याही एकावर ही वायर तयार करायची आहे. म्हणजे एक किंवा दोन मिटर लांब एक्स्टेन्शन बनेल. इथे दोन मिटरचा तुकडा वापरला आहे.

अडॅप्टर उघडून फेज आणि न्युट्रल जोडायच्या. यासाठी थ्रीपिन प्लग वापरला असता तर फक्त एकास चार्जिंग करता येते पण अडॅप्टरमुळे तिथे आणखी एक पॅाइंट तयार होतो. हा रेल्वेत उपयोगी पडेल. हॅाटेल रुममध्ये बऱ्याचदा एकच सॅाकेट पॅाइंट असतो अथवा एकच चालू असतो. तिथून थोडे दूर काम करता येईल.

मधला स्विच हा फेजवर ठेवायचा आहे. न्युट्रल डिरेक्ट आहे.

टुपिन सॅाकेट जे बाजारात मिळतात त्यामध्ये कोणताही चार्जर बसणार नाही. सॅाकेटमधल्या होल्डर पिना थोड्या दूर कराव्या लागतील. हे थोडे खटपटीचे काम आहे. पण सॅाकेटचे प्लास्टिक सॅाफ्ट असल्यास सोपे होईल. वर टेप मारावी म्हणजे स्क्रू निघणार नाही.

फोटो १ वायर

फोटो २

फोटो ३

आणखी दोन पर्याय
मल्टिप्लग आणि टु_पिन प्लगसह
फोटो ४

मल्टिप्लग आणि साधा एकश्टेन्शन बॅाक्स
यामध्ये काही खटाटोप नाही परंतू अधिक सेफ आणि जरा आकार वाढतो.
फोटो ५

-----------------------
धोके आणि सूचना
१) एसी २३० व्होल्ट्सचे काम आहे, पूर्ण खात्रीशिवाय करू नये. किंवा माहितगाराकडून करून घ्यावे.
२) टुपिन सॅाकेटचे टोक पाण्यातवगैरे पडणार नाही याची वापरताना काळजी घ्यावी किंवा एक्सेटेन्शन वायर एक मिटर लांबीचीच बनवावी.
३) मध्ये स्विच ठेवला असला सोयीसाठी तरी मुळातच मेन्ससॅाकेटमध्ये फेज वायर डाविकडे असल्यास या स्विचचा उपयेग होणार नाही. फेज प्रवाह बंद करता येणार नाही.
४) चार्जरमधली युएसबी वायरच इक्सटेन्ड केली तर? असे बरेच विडिओज युट्युबवर आहेत. चार्जमधून डिसी +/_ ५ व्होल्ट्स प्रवाह येणे अपेक्षित असते. ती वायर लांब केल्यास तेवढे वोल्टेज दूरवर पोहोचत नाही हा डिसीचा दोष असतो. एसी वायर वाढवल्याने काही फरक पडत नाही पण वापर काळजीपूर्वक करावा लागतो.
५) तुमच्याकडे वायर गुंडाळायचा पॅार्टबल हलका छोटा एक्सटेन्शन बोर्ड असेल तर त्याचा प्लग काढून तिथे अडॅप्टर बसवला तरी चालेल. हा पर्याय अधिक सोपा आहे, आणि कमी खटपट आहे.