
क्षण कण कण..
काळोखाची चाहूल,
एकांडा पक्षी,
घरट्याच्या शोधात.
बहराशी फटकून,
शिशिराच्या आठवणीत,
निष्पर्ण चिनार.
निजल्या आसमंतात,
एकुलती जाग,
कोणत्याशा खिडकीत.
विस्मृत समाधी,
सभोवताल पाचोळा,
सुकलेला फुलोरा.
आकाशाचा भरवंसा,
समुद्राच्या साथीने,
गलबताचा प्रवास.
एकुलता सोबती,
लवलवत्या चितेचा,
नि:शब्द नदीकाठ.
म्हातारपण थकतं,
एकाकी शांतता,
आठवणी धुरकट.
धडाडते आगगाडी,
अंधाराला चिरत,
क्षणासाठी उजळत.
चकाकत्या इमारती,
मोडक्या घरकुलाशी,
फटकून, तुटक.
विझलेली आस,
फाटक्या झोपडीत,
चाचपडते स्वप्न.
देशोधडीचं नशीब,
खपाटीचं पोट,
हतबल सटवाई!
