३८ तास ३५ मिनिटं
२००पैकी १७८ कि.मी. झाले आहेत आणि दोन्ही मांड्याना क्रॅम्प्स आलेत; थोडं थांबून पुढे निघायचं आहे...
३०० च्या BRMमध्ये १९० कि.मी.ला इतका थकवा आलेला आहे की उरलेले होतील का नाही हा विचार करण्यासाठीचा वेळ सायकलिंग करत घालवणं चालू...
पुणे-कोल्हापूर-पुणे ४०० कि.मी.चं अंतर फेब्रुवारीत रात्री ७-७.५ डिग्री ते ३१ डिग्री दिवसा असं करताना समजेनासं झालेलं...
६०० मात्र सगळ्यात सोप्पं गेलं, कारण नुकतंच आठवडाभरापूर्वी १०० कि.मी. x ७ दिवस असा उपद्व्याप करून झाला होता....
मार्च २०१८ : खरं तर रविवार असल्यामुळे १०० कि.मी. सायकलिंगचा प्लॅन होता. ५० कि.मी.नंतर परतायचं की दोघं मित्र २०० करणार आहेत त्यांच्यासोबत जायचं, हा प्रश्न २०० कि.मी. झाल्यावर सुटला.....
जुलै २०१८ : हेडविंडमुळे (विरुद्ध दिशेने वाहणारा वारा - सायकलिस्ट्सचा मोठा शत्रू) ३०० कि.मी. सायकलिंग ६०० कि.मी.च्या ताकदीनं करावं लागत आहे..
आॅगस्ट २०१८ : ४०० कि.मी.साठी २७ तास दिलेले असतात, त्यापैकी २० तास पावसातच आहे. अंगावरचे कपडे भिजून दोनदा पूर्ण वाळलेत, पायावर उडालेला चिखल वाळून गेलाय, झटकल्यावर माती पडते आहे.....
सेनाकर्ते, देशपांडे मामा, मी
मी, आबा पाटील, मिलिंद थत्ते, अनुप कोहळे
हे लिहायला बसलोय, त्यामुळे काही आठवणी डोळ्यासमोर तरळत आहेत.
शाळा १९९८ साली संपल्यावर सायकलिंग परत सुरू करायला २०१२ उजाडलं आणि ५-१० कि.मी. - तेसुद्धा अतिशय अनियमित असं सायकल चालवणं होतं. पुढची ३ वर्षं तर सायकलिंग बासनात गुंडाळून ठेवलं गेलं होतं.
सप्टेंबर २०१५पासून जरा बऱ्यापैकी, म्हणजे आठवड्यातून ४-५ वेळा किमान २० कि.मी. सायकलिंग सुरू झालं. हळूहळू वाढवत नेऊन एका वीकान्ताला (शुक्र-शनि-रवि.) असं ३०, ४० आणि ५० कि.मी.चं अंतर पाठोपाठ केलं आणि स्वत:ची क्षमता जोखली.
(डावीकडून) श्रेयस अभ्यंकर, सुमित कुलकर्णी आणि मी. तिघही SR आहोत
आठवड्यात ३०-३५ कि.मी.च्या राइड्स नियमित नाही, पण बऱ्याच होत होत्या. अशाच एका रविवारी ६५ कि.मी.ची मोठी राइड, तीदेखील मराठवाड्याच्या स्पेशल उन्हाळ्यात करून झाली आणि मोठ्या म्हणजे १००+ कि.मी.च्या राइडचे वेध लागले. ती पहिलीवहिली शंभरी करायला २०१६चा जून उजाडला आणि गंमत म्हणजे एकट्याने जाऊन सव्वाचार तासात हा milestone गाठला. तो रविवार फारच भारावलेला गेला होता.
त्याच डिसेंबरमध्ये औरंगाबाद-पुणे असं २३० कि.मी. असा एकट्याने मोठा पल्ला मारला (ह्यावर माझा पहिलावहिला लेखदेखील लिहून झालेला आहे बरं!) https://www.misalpav.com/node/38852
शीर्षकात दिलेली वेळ आजतागायतची सगळ्यात मोठी सायकलिंग राईड ६१४ कि.मी.साठी लागलेली आहे. BRM किंवा Brevet सिरीजमधला मानाचा टप्पा ६०० कि.मी.ची ब्रेव्हे.... स्वत:ची मर्यादा ओळखण्यासाठीचा पाडलेला यशस्वी प्रयत्न!!
ह्या सिरीजला Super Randonneur किंवा SR सिरीज म्हटलं जातं. २००, ३००, ४०० आणि ६०० कि.मी. असे चार टप्पे एका वर्षात (one calendar yearमध्ये - नोव्हेंबर ते आॅक्टोबरमध्ये) पार पाडल्यावर SR किताब मिळतो आणि तो मी मिळवला आहे... ह्याच वर्षात :))
६ जानेवारी २०१८ला मी ६०० कि.मी.ची ब्रेव्हे पूर्ण केली, त्याआधी १२ नोव्हेंबर २०१७ला २०० कि.मी.ची केली होती. ३०० कि.मी. २० जानेवारीला आणि ४०० कि.मी.ची ३ फेब्रुवारीला, अशी ही सिरीज संपवली आणि आज १४ आॅगस्टला जेव्हा ह्याबद्दल लिहायला घेतलं आहे, तोपर्यंत दुसऱ्यांदा २००, ३०० आणि परवाच - म्हणजे ११ आॅगस्टला ४०० कि.मी.च्या ब्रेव्हे परत एकदा पूर्ण करून झाल्या आहेत ;))
BRM वगैरे करणाऱ्यातले आपण नाही, हे मनात पक्कं ठरलेलं होतं. अनेक जण विचारून, चुचकारून, प्रेमाने किंवा अगदी रागावूनही BRM न करण्याच्या माझ्या निर्णयाला बदलू शकले नव्हते.
जुलै २०१७ : एक दिवस अचानक साक्षात्कार झाला (मी BRM करायचं ठरवलं) आणि अनेक लोक आश्चर्यचकित झाले. मी ३०० कि.मी.च्या BRMचं registration करून टाकलं. नवे प्लेयर्स सहसा २०० कि.मी.ने सुरुवात करतात. (आपण मुळातच प्रवाहाच्या विरोधात पोहोणारे ना!)...
मागच्या आख्ख्या महिन्यात मिळून २०० कि.मी.सुद्धा नव्हते झाले आणि मी २० तासांत ३०० करणार होतो. मनाची तयारी सुरू केली (शरीर त्याचंच ऐकतं...) शेवटचे २-३ दिवस performance anxiety नावाचा पाळीव प्राणी सोबत होताच, पण आपण उसनं अवसान घेऊन cool dude असल्याचं स्वत:ला जाणवून देत होतो... आणि ३०० कि.मी. ब्रेव्हेला फक्त ७ मिनिटं उशीर झाला, म्हणून Late Finishचा शिक्का लागला होता. त्यामुळे मेडल मिळणार नव्हतं. मग दुसरा प्रयत्न (परत शहाणपणा केलाच) ६०० कि.मी.चा करताना २०० कि.मी. झाले आणि mental blockमुळे तिथेच सोडून देऊन घरी आलो.
कितीही नाही म्हटलं, तरी ह्या दोन्ही राइड्सचं शल्यं कुठेतरी बोचत होतं आणि त्यावर उत्तर सापडतच नव्हतं. दरम्यान डेक्कन क्लिफहँगर पुणे-गोवा रेस (चार जणांची रिले टीम) यशस्वीरित्या पूर्ण केली आणि मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झाला. तेव्हापासून कोणतंही अंतर अशक्य वाटेनासं झालं!!
डावीकडून देशपांडे मामा, सागर पाध्ये, आनंदराव नाईक, अभिजित बुचके, शैलेंद्र कवाडे, सुमित कुलकर्णी, मनोज (मोदक), प्रशांत तायडे, मी
डावीकडून शैलेंद्र कवाडे, डॉ. अमित समर्थ, प्रशांत तायडे, मी, सुमित कुलकर्णी
२०१७च्या सुरुवातीलाच माझ्या सायकलिस्ट मित्रांच्या ग्रूपमध्ये ५० कि.मी. x ७ दिवस आणि १०० कि.मी. x ७ दिवस असं चॅलेंज मांडलं होतं आणि त्यापैकी केवळ ५० कि.मी. सलग ७ दिवस चालवण्याचं चॅलेंज जानेवारी २०१७मध्ये पूर्ण करू शकलो होतो आणि १०० कि.मी.चं चॅलेंज खुणावतच होतं. १२ नोव्हेंबरला नगर-औरंगाबाद-नगर अशी २०० कि.मी.ची ब्रेव्हे १० तास १० मिनिटांत पूर्ण केली.
नितीन पाठक काका, श्रेयस, मी
आणि १०० कि.मी. चॅलेंज पूर्ण करता येईल असं वाटायला लागलं होतं. पण नेमके कोणते ७ दिवस नक्की करायचे, ह्या विचारातच डिसेंबरचा शेवटचा आठवडा आला आणि २०१७ वर्षाचे केवळ शेवटचे ७ दिवस उरले.....! पर्यायच नव्हता आणि २५ ते ३१ डिसेंबर असे रोजचे १०० कि.मी. चालवायला सुरू केलं. सकाळी चारला उठून साडेचार ते पावणेपाचपर्यंत घराबाहेर पडायचं आणि साडेनऊपर्यंत घरी पोहोचायचं, असं नित्यक्रमच होऊन बसला होता. चौथ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी काय करतोय, कुठे आहे असा प्रश्न पडला होता आणि हा विचार करेपर्यंत माझे ४० कि.मी. चालवूनदेखील झाले होते;)) सकाळी १०० कि.मी. सायकलिंग, मग १०:३० ते ५:३० ओपीडी आणि लवकर उठायचं म्हणून ९ वाजेपर्यंत झोपणं ह्यात दिवस सरून जायचा. सातव्या दिवशी १०० कि.मी. करून आलो आणि इतकं छान वाटत होतं की विचारू नका. त्या ७ दिवसात ७१४ कि.मी. सायकलिंग झालं होतं आणि ७पैकी ५ दिवस श्रेयस अभ्यंकर हा माझा मित्र सोबत असल्याने मजादेखील आली होती.
अशक्यप्राय वाटणारी गोष्ट करू शकलो आणि तीदेखील रोजची सर्व कामं करत करत, ह्याचं श्रेय माझ्या बायकोला - गौरीला देतो, कारण तिच्याशिवाय हे शक्यच नव्हतं _/\_.
आजच्या घडीला भारतात SR झालेले केवळ ३३८ लोक आहेत आणि पुढच्या महिन्यात ६०० कि.मी.ची ब्रेव्हे पूर्ण झाली, तर मी एका वर्षात दोनदा SR होणाऱ्या १० लोकांमध्ये असेन, ही चांगलीच Achievement ठरू शकते.
मला स्वत:बद्दल अनेक बाबतीत नेहेमीच inferiority complex असायचा, जो सायकलिंगमध्ये मिळवलेल्या यशाने बऱ्याच प्रमाणात कमी झाला आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन वर्षांत आजारी पडण्याचं प्रमाण इतकं कमी झालेलं आहे की तापामुळे किंवा पोट बिघडल्यामुळे झोपून राहिलो किंवा सुटी घेतली असं आठवतच नाहीये!!
आजची शारीरिक क्षमता एवढी आहे की सायकलवर बसलो, तर २०० कि.मी. होऊन जातील आणि फारसा थकवा येणार नाही.
यूट्यूबवर एका व्हिडियोमध्ये एक मस्त कन्सेप्ट होता. त्यात असं सांगितलं गेलं होतं की अपयशापेक्षा यशाच्या विश्लेषण करणं जास्त महत्त्वाचं आहे आणि मला अपयशापेक्षा यशानेच जास्त शिकवलं आहे, असं मी अगदी ठामपणे सांगू शकतो.
असं सायकलिंग जमू शकतं, अगदी कोणीही करू शकतो/शकते. सायकल नियमित चालवत राहिलं तर काहीच अशक्य नाहीये, कारण ह्या सगळ्या Achievements एका सामान्य शारीरिक क्षमतेच्या माणसाच्या आहेत. ह्यामुळे मला सिक्स पॅक्स वगैरे काही आलेले नाहीत, तर - छोटीशी का होईना - ढेरी आहे, जिला मी Core Strength म्हणतो :))
मग आता पुढे काय करणार? असं विचार करायला गेलो, तर १००० आणि १२०० कि.मी.च्या ब्रेव्हे खुणावत आहेत, त्यासाठी पुढच्या वर्षी प्रयत्न करायचा आहे.
असंच एकदा जेवताना बाबांनी मला विचारलं की "सायकलिंगमध्ये तुझा काय Aim आहे?" त्यावर काय उत्तर द्यावं हे तेव्हा सुचलं नव्हतं. पण आज लिहिताना जाणवतं आहे की 'सायकलिंग' हाच माझा Aim आहे!