ईथे ही माझी पहिलीच पाककृती आहे. आमच्या मावळप्रांताची ही पारंपारीक पाकृ आहे. शेंगोळी. हिची आवड एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येते. नविन मानसाला हा पदार्थ शक्यतो आवडत नाही. खायला आणि पहायलादेखील. खास केलेला पदार्थ शेजारी द्यायची पध्दत असल्याने मी हा प्रकार एकदा आमच्या शेजारी दिला होता पण त्यांनी पहाताक्षणीच “ई ऽ हे क्काये?” म्हणत असा काही चेहरा केला की विचारु नका. हा प्रकार वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पिठाचा करतात अनेकजन. पण आम्ही हुलगेच (कुळीथ, हॉर्स ग्राम) वापरतो. त्या शिवाय मज्जा नाही. तर पाहूयात साहित्य आणि पाकृ.
साहित्य:
हुलग्याचे पिठ - दोन वाटी
भाजलेले शेंगदाने - अर्धा वाटी
कोथिंबीर
जिरे
हिंग
लसुण
मिठ
लाल तिखट (मिरची पावडर)
भरपुर तेल (शक्यतो शेंगदाना तेल)
कृती:
पिठ सोडून बाकी सगळे साहीत्य थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यावे. ही पेस्ट हुलग्याच्या पिठात टाकून पिठ घट्ट मळावे. गरजेपुरते पाणी टाकावे. पिठ घट्टच मळावे. सैल झाले तर वेढे पाण्यात विरघळतील किंवा जास्तच घट्ट झाले तर शिजणार नाहीत. हा अनुभवाने येणारा भाग आहे. आता या पिठाचे लहाण लिंबायेवढे गोळे (पेढे) करुन घ्यावेत. येथून पुढील भाग बराच ट्रिकी आणि प्रॅक्टीसचा आहे. तळहाताला थोडे पाणी लावून एक गोळा दोन्ही तळहातांच्या मध्ये हलकेच धरावा. मग दोन्ही तळहात दाब देत मागेपुढे करत सोऱ्यातुन चकली जशी बाहेर पडते अगदी त्याच प्रमाणे आणि तेवढ्याच जाडीचे पिठ हलके हलके खाली येवू द्यावे. ते तुटू न देता खालील ताटात चकली प्रमाणे आकार द्यावा. हा बऱ्याच सरावाचा भाग असल्याने पहिल्यांदा सरळ पोळपाटावर शेंगोळीला लांब आकार देवून मग वेढे करावे.
हे वेढे करत असताना गॅसवर चार वाट्या पाणी ऊकळायला ठेवावे. त्यात दोन चमचे तेल आणि मिठ टाकावे. पाण्याला खळखळून ऊकळी आली की एक एक करत सगळे वेढे पाण्यात सोडावे. ज्या ताटात पिठ मळले असेल ते धुवून, पिठाचा एक पेढा पाण्यात कुस्करुन ते पाणी टाकावे. गॅस मंद करावा आणि जरा खोलगट झाकण ठेवावे. त्यात थोडे पाणी टाकावे. साधारण चाळीस मिनिट न हलवता शिजवावे शिजवावे.
या पदार्थाला कोणत्याही सजावटीची गरज नाही. गरमागरम वाढावे, वरुन कच्चे तेल घ्यावे आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खावे. तोंडी लावायला कांदा हवाच. शेंगोळी जर ऊरलीच तर सकाळी लोखंडाच्या तव्यावर गरम करावी. अप्रतिम लागते.
[१.तयार शेंगोळीचा फोटो मुद्दाम दिला नाहीए. कारण जे पहिल्यांदाच हा पदार्थ ट्राय करणार असतील तर फोटो पाहून करणार नाही असे वाटले.
२. फोटोतील शेंगोळी मी हातावर केली आहे, बायकोने नाही:) ]
