साहित्य
६ उकडलेली अंडी
१ पाकीट थाई रेड करी पेस्ट (मी रिअल थाई ची वापरली)
४०० मिली नारळाचं दूध
१ कांदा उभा चिरून
१ वाटी मशरूम, चिरून
१ वाटी बेबीकॉर्न, चिरून
१ वाटी रंगीत ढोबळी मिरच्या, चिरून
अर्धी वाटी ब्रोकोली
१ चमचा सोया सॉस
१ चिमूट साखर
१ चमचा लाल तिखट (ऐच्छिक)
गवती चहाची पानं, ठेचून (असल्यास)
२ चमचे तेल
१ चमचा कॉर्नफ्लॉर
अर्ध्या लिंबाचा रस
मीठ चवीनुसार
कृती
हि पाककृती खरं तर अगदीच झटपट केली. पर्वा अचानक वळव्याची एक जोरदार सर येऊन गेली आणि मग काहीतरी कंफोर्ट फूड खायची इच्छा "इकडून" आली. बरेच दिवस थाई करी पेस्ट घरी पडून होती, मग ती वाया जाऊ नये, म्हणून जवळच्या भाजीवाल्याकडून मिळतील त्या भाज्या आणल्या, घरी नारळ होताच, त्याचं दूध काढून घेतलं.
[पाककृती घाईघाईत केल्यामुळे इतर छायाचित्र नाही काढली, तरी क्षमस्व, प्लेटिंग अचानक सुचलं, आणि जमेल तसं केलंय]
भांड्यात तेल गरम करून त्यात करी पेस्ट २ ते ३ मिनिटे परतून घ्या. ह्यात सगळ्या भाज्या टाकून, भाज्या ५ ते ७ मिनिटे परतून घ्या. ह्यात थोडं पाणी घालून, गॅस मंद करून, झाकण ठेवून भाज्या ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या. सोया सॉस, साखर घालून मग नारळाचं दूध घाला. वापरत असल्यास गवती चहाची पानं घाला. चव घेऊन, तिखट वाढवायचं असल्यास १ चमचा तिखट घाला. मंद गॅस वर उकळी येऊ द्या. करी दाट करायची झाल्यास १ चमचा कॉर्नफ्लॉर १ ग्लास पाण्यात घोळवून ते टाकून, करी दाट करून घ्या. उकडलेली अंडी उभी चिरून करी मध्ये सोडा. चव घेऊन मीठ घाला.
वाढताना, करी गरम करून, गॅस वरून काढून त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून, गरमागरम भात बरोबर सर्व्ह करा!