सोडे कोलंबीपासून बनवतात. सोललेल्या कोलंब्या म्हणजे सोडे.
मोठ्या कोलंब्या सोलून त्या सरळ ठेऊन उन्हात कडकडीत वाळवून साठवणीसाठी तयार करतात.
साहित्यः
वाटीभर सोडे
पाच-सहा लसुण पाकळ्या ठेचून
हिंग थोडसं
हळद १ चमचा
लाल मसाला २ चमचे
चवीनुसार मिठ
तांदळाचे पीठ १ चमचा
लिंबाएवढी चिंच
फोडणीसाठी तेल
फोडणीसाठी तेल
२ मध्यम चिरलेले कांदे
कोथिंबीर चिरलेली थोडी
२ हिरव्या मिरच्या मोडून
भरीसाठी भाज्या हव्या असतील तर
१ वांग फोडी करून
बटाटा फोडी करून
शेवग्याच्या शेंगा तुकडे करुन
पाककृती
सोडे कोमट पाण्यात १० मिनीटे भिजत घालावेत.
गॅसवर भांडे गरम करुन तेल टाकून लसूण फोडणीला द्यायचा व त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवायचा. आता त्यावर हिंग, हळद मसाला घालायचा.
ते एकजीव झाले की कोलंबीचे सोडे, शेंगा, बटाटे व वांगी घालायची.
आता त्यात गरजेनुसार पाणी घालायचे व भाज्या शिजू द्यायच्या.
भाज्या व सोडे शिजले की त्यात चिंचेचा कोळ करून त्यातच तांदळाचे पीठ कालवून तो कोळ रश्यात घालावा. पुन्हा कालवणाला एक उकळी येऊ द्यावी व मिठ घालावे. नंतर गॅस बंद करण्यापूर्वी मोडलेल्या मिरच्या व कोथिंबीर घालावी म्हणजे कोथिंबीर व मिरच्यांचा सुगंध टिकून राहतो.
आता घरभर मस्त सोड्यांच्या कालवणाचा घमघमाट सुटलेला असतो व आपोआप भूक लागते.