सुधारस हे पक्वान्न बहुसंख्य मराठी घरात ऐतिहासिक किंवा आठवणींच्या कोषात जाऊन पडलं असलं तरी आमच्याकडील जेवणाच्या ताटात मात्र आजही सुधारस आपलं स्थान टिकवून आहे. याचं मुख्य कारण म्हणजे यासाठी लागणार्या सामग्रीची सहज उपलब्धता, कमीत कमी लागणारा वेळ आणि कौशल्य ,ही त्रिसूत्री. तर मग करुया की सुधारस लगेचच!
आधी साहित्याची जमवाजमव करू.
३ मोठ्या लिंबांचा रस किंवा १ वाटी रस
साखर रसाच्या तिप्पट म्हणजे ३ वाट्या भरून
पाणी दीड वाटी
८-१० केशरकाड्या थोड्या पाण्यात भिजत घालणे
बदाम ,पिस्ते काप,बेदाणे,वेलची दाणे/पूड, स्वाद आणि सजावटीसाठी ,आवडीनुसार

आता कृती.
१.एका पसरट भांड्यात साखर घ्या, त्यात पाणी घाला(साखर भिजली पाहिजे)
२.मध्यम आचेवर पाक करायला ठेवा. सतत ढवळत रहा.
३.पारंपारीक भाषेत गोळीबंद पाक हवा.पण बरेचदा गोळीबंद पाक करण्याच्या नादात पुन्हा साखर व्हायला लागते. (अनुभवाचे बोल). म्हणून साधारण ५ ते ७ मिनिटांनी आच बंद करा.
४.पाक जरा गार होवू दे. मग पाकाचा दाटपणा तपासा.(कारण गार झाल्यावर पाक थोडा दाट होतो)
५.साधारण मधाइतपत झाला की पुरे. पातळ वाटल्यास पुन्हा १-२ मि. उकळावा.
६.पाक निवला की त्यात लिम्बुरस,केशरपाणी(हे पाक करतान घातलं तरी चालेल),बदाम,पिस्ते,वेलची घालून नीट ढवळा.
७.सुधारस तयार आहे पण खायला मात्र दुसर्या दिवशी घ्यायचा.कारण सारे घटक समरस झाल्यावरच त्याचा आंबट गोड स्वाद चाखता येतो.

तर मग मंडळी,आता सुधारसाची फक्त आठवण न काढता मनात आलं की करा आणि खा!
जाता जाता अजून एक युक्ती! यात थंडगार पाणी घातलं की झटपट लिंबू सरबत तय्यार!