मेथी डाळवडे

थंडी आली की,माझी आई आहारतल्या मेथीचे प्रमाण वाढवायची.मेथीचे लाडूही केले जायचे,पण मला ते कधीच आवडायचे नाहीत.मेथीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार,मेथी घालून डोसे,घावणे, धिरडी,थालिपीठं बरंच काय काय व्हायचं.त्यातलाच एक चमचमीत पदार्थ म्हणजे मेथी डाळवडे,नाश्त्याला हमखास असायचेच.भरपूर थँडियासायची तेव्हा दिवळीपासूनच.सकाळी पहाते उठून अभ्यासला बसायचो तेही स्वेटर घालून, कं बांधून.आणि अभ्यास अर्धयवर आलेला असतानाच पाट्यावर वेतनाचा आवज येऊ लागायचा.लसूण,मिरच्या ठेचून,त्यात कोथींबीर,ओळखोबरे,मीठ ,साखर घालून चटणी वॅट असायची आई.हल्ली मिक्सरमध्ये वाटण जरताना मिक्सर उघडल्याशिवय काय वाटलं जातंय ते कळत नाही,पण पाट्यावर वाटताना ,वाटली जाणारी प्रत्येक गोष्ट आपला वेगवेगळा सुवास सोडत असायची आणि कान बंद असले तरी उघड्या नाकाला काहीतरी चमचमीत,तोंडात जाणार असल्याची सुवार्ता देऊन मनाला सुखवीत असे.चटणी वाटून झाली की त्याच पाट्यावर भिजलेल्या डाळी लसूण,मिरची, आल्यासह वाटल्या जायच्या.बाकीचे सोपस्कार पार पाडून १०/१५ मिनिटातच स्टोव्हच्या फुरररर आवाजासोमत डाळवडे कढईत पडल्याचा चुररर आवाज येत असे आणि त्याबरोबरच चणाडाळ आणि मेथीचा घमघमाटही नाकात शिरून जिभेला पूर आणत असे.एव्हाना वातावरणातला थंडावा कमी झालेला असे,स्टोव्हच्या उबेने,तेव्हा आम्ही कानावरचे रुमाल सोडून आईची हाक कधी कानावर पडते याकडेत्या फुररर आणि चुररर च्या तालावर ध्यान लावत असू.
"चला रे,या नाश्ता करायला",असा आईचा आदेश आला की आम्ही तत्पर आज्ञाधारकपणे जात असू,आणि मग मेथी डाळवडयांचा समाचार चवीने घेत असू.
आताही मी मेथी डाळवडे करते,त्या चित्रातली आई,पप्पा,दोन भाऊ ही मंडळी आज नसली तरी त्यांच्या सोबतीनेच खाते.
त्या डाळवड्यांची ही कृती मिपाकरांसाठी.लागा तर डाळवडे खायच्या तयारीला.
साहित्य:-
१. अर्धी वाटी चणाडाळ
२. पाव वाटी तूरडाळ
३. पाव वाटी मूगडाळ
४. पाव वाटी मसुरडाळ
५. पाव वाटी उडीदडाळ
६. पाव वाटी तांदूळ
७. मूठभर काळे वाटाणे
८. १०/१२ लसूणपाकळ्या
९. पेरभर आले
१०. ४/५ हिरव्या मिरच्या
११. अर्धी वाटी बारीक चिरलेली मेथी
१२.अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१३. एक लहान कांदा बारीक चिरून
१४. एक चहाचा चमचा मिरचीपूड
१५. एक चहाचा चमचा धणेपूड
१६. पाव चहाचा चमचा जिरेपूड
१७. अर्धा चमचा गरम मसाला पूड १८.मीठ चवीनुसार
१९. तेल तळण्यासाठी.
कृती:-
१. अनुक्रमांक १ ते ७ पर्यंतच्या वस्तू रात्री भिजत घाला.
२. अनुक्रमांक १ ते १० पर्यंतच्या वस्तू ,पाणी न घालता दरदरीत वाटून घ्या.
३. अनुक्रमांक ११ ते १७ पर्यंतच्या वस्तू त्यात मिसळा व हाताने छान कालवून घ्या
४. तेल तापत ठेवा.
५. पाण्याचा हात घेऊन हातावर लिंबाएवढा गोळा घेऊन चपटा थापा.
६. गरम तेलात अलगद सोडा व लालसर रंगावर तळून ,निथळून काढा.
७.आधी करून ठेवलेल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.