साहित्य
१/२ किलो कोळंबी, साफ करून
१ मोठ्या लिंब एवढा चिंचेचा गोळा
१ चमचा मेथीदाणे
२ मोठे चमचे लाल तिखट [असल्यास काश्मीरी पण थोडी वापरावी, लोणच्याला रंग सुंदर येतो]
२ मोठे चमचे हळद
१ चमचा मोहरी
१/२ चमचा हिंग
मीठ चवीनुसार
४ मोठे चमचे तेल
कृती
हि पाककृती आईची, तिच्याकडून शिकलो, अगदीच सोप्पी आणि झटपट होणारी. कोळंबी स्वच्छ धुवून, कोरडी करून घावी. त्याला एक चमचा हळद, तिखट आणि थोडं मीठ लावून बाजूला ठेवावी. चिंच गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढून घ्यावा.
कढईत तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी आणि मेथीदाणे ची फोडणी करावी. ह्यात हळद आणि लाल तिखट टाकून, काही सेकंद परतून, लगेच चिंचेचा कोळ टाकावा. गॅस बारीक करून, २ मिनिटे कोळ शिजू द्यावा. आता ह्यात कोळंबी टाकून, ती छान शिजेस्तोवर परतून घावी [कोळंबीला शिजायला जास्ती वेळ लागणार नाही, फार तर ३ ते ५ मिनिटे].
चव घेऊन, तिखट, मीठ पाहिजे तसे वाढवावे. गॅस बंद करून हे लोणचं थंड झाले कि कोरड्या, स्वच्छ काचेच्या बरणीत भरून फ्रिज मध्ये ठेवावे. गरम पोळी किंवा सोलकढी-भाता सोबत तोंडीलावणी साठी अगदी मस्त आहे हे लोणचे! फ्रिज मध्ये ठेवल्यास किमान १० दिवस तरी सहज टिकते.[अर्थात त्या आधीच खाऊन संपते!]