
मिपाकरहो, आपल्या सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
दिवाळी म्हणजे घरोघरी फराळ, फटाके आणि पाहुणे या बिग थ्रीचे आगमन झाले असेलच. तर घरी येणार्या पाहुण्यांना फराळाबरोबर वाढायला आणि बच्चेकंपनीला येता जाता तोंडात टाकायला एक झटपट पाककृती आपण बघणार आहोत.
साहित्य -
- कणीक २ वाट्या
- मीठ,
- हळद
- लाल तिखट
- तीळ
- किंचित ओवा
- १ लहान चमचा साखर विरघळलेले पाणी
- तेल - साधारण अर्धी वाटी किंवा किंचित कमी
कृती -
कणकेत मीठ, हळद, लाल तिखट, तीळ, ओवा आणि तेल घालून कणीक नीट मिक्स करावी. मिक्स केलेले पीठ जरासे भरड दिसू लागेल इतपत तेल टाकावे.मग साखरेचे पाणी घालावे. मग साधे पाणी टाकून सगळे एकत्र करून छान मळून काढावे.
या पिठाच्या अगदी पातळ पुर्या लाटून घ्याव्या. लाटलेल्या पुर्या थोडा वेळ तशाच राहू द्याव्या. लगेच तळू नयेत.
लाटल्यानंतर एक दहा-पंधरा मिनिटांनी त्या पुर्या तेलात मंद आचेवर तळून घ्याव्यात. पुर्या फुलता कामा नये.
थंड झाल्या की डब्यात भरून ठेवाव्यात.
अगदी दहा- बारा दिवसही पुर्यांना काहीही होत नाही. छान राहतात. साखरेच्या पाण्यामुळे पुर्या क्रिस्पी होतात. टेक्श्चरही छान येते. गुजराती घरांमध्ये तर हा पदार्थ दिवाळीत हमखास बनवला जातो.
दिवाळीतच नाही, तर इतर वेळीही या पुर्या कधीही करून ठेवण्यासारख्या आहेत. चहाच्या वेळी खायला आणि प्रवासाला नेण्यासाठी उत्तम. दिवाळीच्या गोडाधोडाच्या जेवणावर उतारा म्हणून आणि दगदगीचा श्रमपरिहार म्हणूनसुद्धा या पुर्या आयत्या वेळी मस्त कामाला येतात. कुठलीही चटकन होणारी रस्साभाजी किंवा घट्ट दाल फ्राय बनवा आणि त्याबरोबर या खुसखुशीत पुर्यांचा आस्वाद घ्या.
