कोणे एके काळी दिल्ली नावाचे एक महानगर होते. तेथे दौलत नावाचा एक व्यापारी राहत होता. हिवाळ्यात त्याचा एक नेम होता. नेमाला तो काय करी? तर म्हशीचे घट्ट दूध घेई. त्याबरोबर मलई घेऊन ते एका मोठ्या मातीच्या भांड्यात एकत्र करी. मग ते भांडे झाकून रात्री बाहेर ठेवी. त्यावर बर्फाची लादी ठेवी.

(अर्धा लीटर होल मिल्क(तुम्ही म्हशीचे दूध वापरू शकता), अर्धा ते पाऊण कप हेवी क्रीम. हे दूध तापवू नये)

दूध व मलईचे मिश्रण घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवी.

तो डबा बाहेर रात्री चंद्रप्रकाशात ठेवी.
दुसर्या दिवशी भल्या पहाटे तो उठी. दूध आणि मलईचे भांडे घरात घेऊन येई. त्यात साखर आणि केशर घाली. मग ते मिश्रण रवीने घुसळायला सुरुवात करी. जसे जसे ते मिश्रण घुसळले जाई तसे तसे त्यावर फेस जमा होई. जमा झालेला फेस तो एका स्वच्छ गाळणीने गोळा करून एका ताटलीत जमा करी. फेस जमा केलेली ताटली थोडी कलती ठेवी. जेणेकरून दूध एका बाजूला जमा होई. मग ते दूध परत तो दुधाच्या मिश्रणाच्या पातेल्यात जमा करी.

(थोडे केशर आणि ४ टीस्पून साखर. आपल्या आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी अधिक करावे)

अशा प्रकारे फेस येऊ लागेल.

अशा प्रकारे ताटलीत स्वच्छ गाळणीने फेस गोळा करी. ताटली खाली सांडशी ठेवावी म्हणजे ती एका बाजूने कलती राही. जेणेकरून दूध एका बाजूला गोळा होई.

असे करीत ताटलीत पुरेसा फेस जमा झाला की तो मातीच्या कपांमध्ये तो फेस भरायला सुरुवात करी. तसे करताना तो एक चमचा फेस कपात भरल्यावर त्यावर तो अगदी बारीक साखर(पिठी साखर) भुरभुरी. त्यावर परत फेस भरी. असे करत करत ऐका वर एक फेस आणि साखरेचा थर रची.
बारीक कुटलेले पिस्ते, थोडी वेलची आणि थोडा खवा सजावटीसाठी.

शेवटी सजावट म्हणून त्यावर अगदी चिमूटभर वेलचीची पावडर भुरभुरी. मग त्यावर खवा पसरवून घाली आणि शेवटी पिस्ता अगदी बारीक कुटून पसरवी.

झाले, हा अनोखा चाट तो हिवाळ्यात दर दिवशी दिल्लीकरांस विकावयास सज्ज होई.

मंडळी सर्वप्रथम ही पाकृ नेटफ्लिक्सवरील "राजा रसोई और अन्य कहानियां" या माहितीपट मालिकेमध्ये दिल्लीवरच्या भागात पाहिली. तेव्हापासून आपण दिल्लीला कधी जाऊन हा चाट खाणार याची ओढ लागली. मात्र तोपर्यंत काय? अनायासे मिपा दिवाळी अंकाची घोषणा झाली आणि आयती संधी मिळाली. मग मिपावरील सर्व सुग्रास पाकृ देणार्या भाऊ आणि भगिनींना नमन करून रवी हाती घेतली ;-) . भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी दिल्लीत एक दौलत नावाचा व्यक्ती हा चाट प्रकार विकायचा. म्हणून मग या पाककृतीला दिल्लीकरांनी नाव दिले "दौलत की चाट". हा चाट प्रकार फक्त हिवाळ्यात मिळतो. साधारपणे दिवाळी ते होळीच्या सुमारास. आजही हा चाट प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. चाट विक्रेते आजही हा चाट पारंपरिक पद्धतीने करतात. जसे की दूध आणि मलई एकत्र करून रात्रभर बाहेर झाकून ठेवतात. त्यावर बर्फही लावतात. मग भल्या पहाटे उठून ते मिश्रण घुसळतात आणि विक्रीसाठी सज्ज होतात. हिवाळ्यात आणि दूध मलईचे मिश्रण अशासाठी बाहेर ठेवतात की बाहेर पडणार्या दवामुळे हे मिश्रण अधिक हलके होण्यास मदत होते. जिभेवर ठेवल्याबरोबर हा चाटचा प्रकार विरघळून जातो इतके ते हलके असते. अर्थात एक गोष्ट विसरू नये ती म्हणजे हा पदार्थ लाकडी चमच्याने खावा!!
या चाटच्या उगमाचा थोडासा वेध घेऊयात. कुणी म्हणतात की मुघल राजवटीच्या काळात हा प्रकार अफगाणांबरोबर आला. कुणी म्हणतात की हा प्रकार "सिल्क रूट" मार्गे भारतात आला. पण आपल्याला काय चांगले ते खाण्याशी मतलब ;-) . असेही म्हणतात की पौर्णिमेला हा चाट केल्यास आणखींना बहारदार होतो. त्यामुळे या दिवाळीच्या गुलाबी थंडीत आपणही खा आणि आपल्या मित्रपरिवारालाही खाऊ घाला तोंडात विरघळणार दौलत की चाट. मी वर केलेली पाकृ पारंपरिक पद्धतीने केली आहे. मात्र तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने सांगते. वर सांगितलेले साहित्य घ्यावे. दूध आणि मलई(क्रीम)चे मिश्रण रात्रभर फ्रीज मध्ये ठेवावे. सकाळी ते ब्लेंडर ने घुसळावे. बाकी सजावट वर सांगितल्याप्रमाणेच करावी.
लगेच खायचे नसल्यास हा चाट फ्रीज मध्ये ठेवावा आणि मग त्वरित खावे. इति दौलत की चाट नामे कथा सुफळ संपूर्ण!!

ता. क. - सर्व मिपाकरांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
माहितीचा स्रोत - राजा रसोई और अन्य कहानियां, बावर्ची.कॉम
