स्मृतिगंध

Header2

दिवाळी तोंडावर आली होती. शनिवार-रविवारला जोडून सोमवारची सुटी आल्याने आज नीरजाने फराळाचा घाट घातला होता. सकाळपासून चिवडा आणि चकल्या बनवून झाल्या होत्या. आता जरा निवांत बसावं आणि घोटभर चहात श्रमपरिहार शोधावा, असा विचार करून नीरजाने चहा टाकला. आता उद्या बेसनाचे लाडू बनवू या, की मग बस झालं. बाकी सर्व बाजारातून तयार आणायचं. हल्ली पूर्वीसारखी श्रमाची कामं जमत नाहीत आणि तेवढा उत्साहही नाही राहिला. रवी - तिचा नवरा - नेहमी तिला चिडवायचा की आता तू म्हातारी झालीस. कशाला हे सर्व घरी करायचं? बाजारातूनच आण. पण तिला आपल्या हातचे निदान २-४ पदार्थ तरी आपल्या नवर्‍याच्या आणि मुलाच्या पोटी जावेत असं वाटायचं.

कपात चहा गाळून आणि चवीला म्हणून २ चकल्या घेऊन ती गॅलरीतल्या खुर्चीत विसावली. संध्याकाळचे ५ वाजले होते. सहाव्या मजल्यावरून खाली नजर टाकली. खाली कॉलनीत संध्याकाळची एक निवांत धावपळ चालू होती. दिवाळीसारखा मोठा आणि महत्त्वाचा सण तोंडावर आल्याने कॉलनीच्या मारवाड्याच्या दुकानात चांगलीच गर्दी होती. दिवाळी आल्यामुळे मारवाड्याचं दुकानही विविध वस्तूंनी खचाखच भरलं होतं. वेगवेगळ्या भाजण्या, अनारशाच्या पिठापासून तयार मिठाई आणि आकाश कंदील, फटाके सर्व काही होतं. त्यामुळे दुकान गिर्‍हाइकांनी फुललं होतं.

हवेत छान गारवा होता. वाराही जरा उदार मनाने वाहत होता. चहा घेता घेता नीरजा रिलॅक्स झाली. आजची फराळाची कामं आटोपली होतीच. रात्रीचा स्वयंपाकही करायचा नव्हता. रात्री जेवायला बाहेर जायचं होतं. तिच्या मुलाच्या - सुशांतच्या - बॉसने जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. खाली कॉलनीतील मुलांचा गोंगाट चालू होता. 'शर्वरीsss, मालविकाsssss, अनन्ताsssss' अशा ललकार्‍यांनी बाल उत्साह ओसंडत होता. दिवाळीची सुट्टी 'एन्जॉय' करणं चाललं होतं. मॅगी, दूध-बिस्किटं खाऊन ही मुलं खेळायला नुकतीच बाहेर पडली असणार. तिच्या लहानपणी भारतात 'मॅगी'चं आगमन झालं नव्हतं. एवढंच काय, हॉटेलिंग हा प्रकारही नव्हता. घरीच सांजा, पोहे, पोळीचा कुस्कुरा, दूध पोळी नाहीतर फोडणीचा भात हीच पंचपक्वान्नं असायची. शाळेत तर कित्येकदा, तिला आवडायचं म्हणून पोळीचा लाडू नाहीतर गव्हाच्या पिठाचा शिरा असायचा. गव्हाच्या पिठाच्या शिर्‍याने तिच्या शाळेतल्या स्मृती चाळवल्या. तिच्या मैत्रिणींनाही तिच्या आईच्या हातचा गव्हाच्या पिठाचा शिरा खूप आवडायचा. घरचं खमंग साजूक तूप, वेलची पावडर आणि गूळ.... अहाहा!!!
शाळेच्या तिच्या जुन्या मैत्रिणी आठवल्या, सर-मॅडम, मुख्याध्यापक आणि अगदी घंटेचे टोल बडविणारा, सुटीची नोटीस वर्गात आणणारा शिपाईसुद्धा आठवला. ह्या सर्व आठवणी म्हणजे तिच्या चिंतामुक्त जीवनातील दागिने होते. नकळत ती सुखावली. शाळेच्या वर्धापनदिवशी ती नाटकात कामं करायची, भरतनाट्यमचं क्लासेसही लावले होते. अभ्यासात फार हुशार नाही, पण चुणचुणीत होती.

कॉलेजची आणि नवयौवनाची सुरुवात एकत्रच झाली. कॉलेजच्या मैत्रिणी फक्त मराठी भाषक नव्हत्या, तर मिश्र भाषक होत्या. पण विचार जुळले होते आणि आता नुसत्या मैत्रिणी नव्हत्या, तर मित्रही होते. त्यांचा असा ३-४ मैत्रिणी आणि २-३ मित्रांचा चमू होता. अभ्यासाव्यतिरिक्त कँटीनच्या मीटिंग्ज, एकांकिका स्पर्धा, स्पोर्ट्स डे हे सर्व असायचंच, तसंच राजकारण, समाजसेवा, ज्येष्ठांचा शिस्तीचा अवाजवी धोशा असे अनेक गंभीर आणि चेष्टेचे विषय असायचे. कृतु (कृतिका), मितू (मिताली), अनु (अनघा), सागू (सागरिका) वगैरे मैत्रीणी आणि रुष (ॠषी), आदू (अद्वैत) (पण तिला आदू नाही, तर अद्वैत नांवच खूप आवडायचं), वैभू किवा भूभू (वैभव) वगैरे मित्र एखाद्या विषयावर शिरा ताणताणून वाद घालायचे. आवाज खूप वाढला की कँटीनचा तंबी येऊन तंबी देऊन जायचा. मग गाडी सौम्य विषयांकडे वळायची.
************************************************************************
"नीरजाssss, ए नीरजाssss!" नीरजा दचकून भानावर आली. देशपांडे आजी खालून हाका मारत होत्या.
"काय हो?"
"अगं, किती हाका मारल्या? काय करते आहेस? झाली का फराळाची तयारी?"
"हो, झाली. या की वरती चव पाहायला."
"अग नको. वेळ नाहीए अजिबात. सामान आणायला निघाले आहे."
"बsssssरं" तिलाही आजी आत्ता वर यायला नकोच होत्या. आत्ता तिच्या निवांत समयी तिला एकांत हवा होता.
नवरा अजून ऑफिसातून आला नव्हता आणि मुलगा त्याच्या खोलीत कॉम्प्युटरवर मग्न होता. नाही म्हटलं तरी अद्वैतच्या आठवणी जाग्या झाल्याच.
*****************************************************************************
ग्रूपमध्ये दोघांचे विचार जुळायचे. वैचारिक पातळीवर तो तिला जवळचा वाटायचा. ग्रूपमध्ये वादावादी झाली की ते दोघेही नकळत एकमेकांची बाजू घ्यायचे. अद्वैत जरा सावळा, अभ्यासात हुशार आणि वादावादीत मुद्देसूद बोलण्याने सामोरच्याची हवाच काढून टाकायचा. पुढे जवळीक वाढत गेली. कधी ग्रूपमध्ये, तर कधी ग्रूपशिवाय कँटीनमध्ये भेटीगाठी वाढू लागल्या. कॉफीच्या एका कपाभोवती गप्पा रंगू लागल्या आणि अद्वैतच्या विनोदी स्वभावाचा नवाच पैलू तिला जाणवायला लागला आणि भावलाही. तिला खळखळून हसायची सवय होती. तो अगदी मंत्रमुग्ध होऊन पाहत राहायचा. आज त्या सर्व आठवणी ताज्या होऊन ती मनोमन सुखावली. शेवटची चकली पुरवून पुरवून खाताना, ते तारुण्याचे क्षण आपण पुन्हा जगतो आहोत असा तिला भास झाला. आयुष्यातील हे सोनेरी क्षण लग्नानंतर तिने मनाच्या पाटीवरून जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक पुसून टाकले होते. पण आज त्या अवखळ आठवणी चौखूर उधळल्याच होत्या जणू. आवरायचं म्हटलं तरी आवरत नव्हत्या.

एव्हाना त्यांच्या ग्रूपमधील मित्रमैत्रिणींनी (आणि ग्रूपबाहेरील काही विद्यार्थ्यांनीही) तिच्या आणि अद्वैतच्या नात्याला लेबलंं लावायला सुरुवात केली होती. मितूने तर संधी पाहून थेट प्रश्नच केला होता. पण "तसं कांही नाहीये गं!" असं म्हणतानाही 'तसंच' काही आहे असे जिवाला हुरहुर लावणारे भास नीरजाला होऊ लागले होते. तो एक अव्यक्त प्रेमाचा काळ होता.

अद्वैतला त्याच्या बाबांनी एक बाईक घेऊन दिली. बुलेट की काय म्हणतात ती. तर दुसर्‍या दिवशी नीरजा कॉलेजला जायला बस स्टॉपवर उभी होती, तर हा बाईक घेऊन तिच्या समोरच येऊन ठाकला. अगदी फिल्मी. तिच्या आवडीचा टीशर्ट त्याने घातला होता. कस्स्ला रुबाबदार दिसत होता. अद्वैतने नीरजाला त्याच्या बाईकवर बसायची खूण केली. स्टॉपवर तसे ओळखीचे कोणी नव्हतेच. ती सराईताच्या आविर्भावात बसली, पण मनातून 'कोणी बघत तर नाही नं?' आशंकेने घाबरली होती.
"ओढणी नीट आवरून घे आणि माझ्या खांद्याला धर." अद्वैत म्हणाला.
बाईक निघाली, तेव्हा एक हलकासा हेलकावा बसला आणि तिने घाबरून त्याच्या खांद्याला धरलं. मुद्दामहून झालेला तसा तो पहिलाच स्पर्श होता. रस्ताभर तो काय बोलतोय इकडे तिचं लक्षच नव्हतं.
कॉलेज जवळ आलं, तसं ती म्हणाली, "कॉलेजच्या गेटजवळच मला सोड."
पण तो थांबलाच नाही. अगदी थेट, त्यांचा ग्रूप बसला होता तिथेच जाऊन थांबला. ग्रूपमध्ये त्याच्या नवीन बाईकचीच जास्त चर्चा झाली. त्यांच नातं मित्र-मैत्रिणींनी गृहीतच धरलं होतं, हे तिला जाणवलं.

त्या दिवशी ती घरी पोहोचली ते हवेत तरंगतच. बाबा आरामखुर्चीत काहीतरी पुस्तक वाचत होते आणि धाकटा भाऊ उमेश एक मोडका मिक्सर दुरुस्त करायचा प्रयत्न करीत होता. दोघांनी मान वर करून बघितलं, पण काही बोलले नाहीत. नाहीतर नॉर्मली बाबा, "या, झालं का कॉलेज?" किंवा उमेश "आल्या महाराणी धाड मारून" किंवा तत्सम वाक्य फेकायचे. पण आज तसं काही झालं नाही. तिला नवल वाटलं. आईलाच विचारावं. कपडे वगैरे बदलून ती स्वयंपाकघरात गेली.
आईने चहाचा कप हाती देता देताच "कोण होता गं?" असा रोखून पाहत प्रश्न केला.
"क..कोण?" तिने वेड पांघरायचा प्रयत्न केला. पण ह्या एकदम झालेल्या हल्ल्याने ती मनोमन थंडगार पडली होती.
"तोच तो, ज्याच्या खांद्यावर हात ठेवून कॉलेजच्या नावावर गावभर भटकतेस, तो."
माय गॉड! पहिल्याच दिवशी बातमी घरापर्यंत पोहोचली होती. ती स्वतःहून एक दिवस घरात सांगणार होतीच, पण हे म्हणजे फार लवकरच भांडं फुटलं होतं.
"वसंताने पाहिलं तुम्हाला आज." वसंता म्हणजे नीरजाचा मामा. त्याने कधी, केव्हा आणि कुठे पाहिलं, देव जाणे. पण तत्परतेने बहिणीच्या कानावर घातलं होतं. बाहेरच्या खोलीत शांतता होती, पण सहजता नव्हती.
"किती दिवस चाललंय हे?" आईने अजून एक मिसाईल डागलं.
"अगं! कसलं काय? माझा कॉलेजचा मित्र आहे. चांगल्या घरचा आहे. आज पहिल्यांदाच आणि तेही, तो म्हणाला म्हणून त्याच्या बाईकवरून गेले. नेहमी बसनेच तर जाते." तिने आवाजात अगदी सहजता आणायचा आटोकाट प्रयत्न केला. प्रकरण जास्त तापलं नाही. पण "हे असले थेर आपल्या घरात चालणार नाहीत, सांगून ठेवते आहे" असा एक माफक दम मिळाला.

अद्वैत सातार्‍याला गेला होता. ८-१० दिवस येणार नव्हता. त्यामुळे त्याच्यासमोर लपवाछपवी करायचा प्रसंग टळला. तो आल्यानंतरही त्याने ऑफर केलेली लिफ्ट तिने शिताफीने नाकारली आणि बस प्रवासच सुरू ठेवला. त्याला कळेना काय झालं. पण अदरवाईज, त्यांच्यातील नातं हसतखेळतच राहिलं. घरचेही तिच्याशी हसून खेळून वागायला लागले आणि तिने सुटकेचा नि:श्वास टाकला. पण तिच्या नकळत चक्र फिरत होती आणि अचानक बाँब पडला.
बाबा म्हणाले, "उद्या कॉलेजला जाऊ नकोस. तुला बघायला एक स्थळ येणार आहे."
बापरे, स्थळ? एवढ्या झटपट? ती हादरली, रडली. "अजून शिक्षण पूर्ण होऊ द्या" असाही हट्ट करून पाहिला, पण तिच्या हट्टापुढे नेहमीच नमतं घेणारे तिचे बाबा म्हणाले, "अगं बेटा, त्यासंबंधी बोललोय मी त्यांच्याशी. लग्नानंतर तुझं शिक्षण पुढे चालूच राहील. ते थांबवणार नाहीत."
बराच वेळ तिने वाद घातला, रुसली, अबोला धरला, पण आई-बाबा बधले नाहीत. ..............ती हरली.

हे सर्व लवकरच अद्वैतच्या कानावर घालणं गरजेचं होतं. त्यांच्यातलं नातं अव्यक्त असलं, तरी दोघांनीही मनाने स्वीकारलेलं होतं. तिने अद्वैतला समुद्रकिनारी बोलावलं. आज त्यांच्या नात्याचा, सूर्याच्या साक्षीने, अस्त होणार होता. काहीच कल्पना नसलेला अद्वैत खूप आनंदात होता. आज आपल्या नात्याला मूर्त स्वरूप प्राप्त होणार, म्हणून होणारा आनंद अद्वैतच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता. त्याचा विरस होणार, त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळणार ह्या कल्पनेने तिला खूप वाईट वाटलं, पण नाइलाज होता.
"अद्वैत, माझं लग्न ठरलंय." तिने धाडकन विषयच संपवून टाकला.
"काssssय?" अद्वैतच्या शब्दातील कंप, धार तिला सहन झाली नाही. तिच्या अश्रूंचा बांध तुटला. ती हमसाहमशी रडू लागली. हादरलेला अद्वैत पुरता भांबावला. काय करावं कळेना. पण लवकरच सावरला.
तिला आपल्या आधाराची गरज आहे, हे जाणून त्याने स्वतःचं दु:ख बाजूला ठेवून तो म्हणाला, "नीरजा, काय झालं हे? असं व्हायला नको होतं. पण....शेवटी आई-बाबांची इच्छा त्यांच्या मुलीच्या सुखासाठीच आहे. त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. तू वाईट वाटून घेऊ नकोस, अपराधी तर मुळीच वाटून घेऊ नकोस. आयुष्यात सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात."
नीरजा ऐकत होती. अद्वैत बोलत होता. सूर्य अस्ताला जात होता आणि ............ तसंच त्यांचं नातंही.
खूप वेळ दोघेही शांत बसून राहिले. नीरजाने स्वतःला बरंच सावरलं होतं. आकाशात दोन पक्षी बराच वेळ विहरत होते. अद्वैत आणि नीरजा दोघेही त्यांना पाहत होते. त्यांना पाहताना दोन वेगवेगळी मनं एकाच भूतकाळात घुटमळत होती. भूतकाळातून पाय निघत नव्हता. त्या पक्ष्यांवरून आपलं लक्ष दूर करून ते त्या मोहक भूतकाळाला जाणीवपूर्वक दूर लोटण्याचा प्रयत्न करीत होते, पण भूतकाळाच्या दोर्‍या कच्च्या नव्हत्या. दोघांचीही बोटं एकमेकांच्या बोटांमध्ये केव्हा गुंफली गेली, दोघांनाही कळलं नाही.
********************************************************************

ह्या सोनेरी आठवणींतून बाहेर येताना नीरजाने एक मोठ्ठा नि:श्वास सोडला. तिच्या लग्नात, संसारात ती आता सुखी होती. नवरा रवी एक सुशील, घरावर, संसारावर प्रेम करणारा होता. मुलगा सुशांत हुशार होता. दोघांनाही नोकरीत स्थैर्य लाभलं होतं. वरच्या पदांवर होते दोघेही. भूतकाळ हा आता निव्वळ भूतकाळ उरला होता. तिचं वर्तमानावर प्रेम होतं आणि मुलाच्या उज्ज्वल भविष्याबाबत ती आश्वस्त होती. नुकतीच त्याला एका आय टी कंपनीत नोकरी लागली होती. आज त्याच्या बॉसनेच जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. पंचतारांकित हॉटेलात जायचं होतं. त्या तोलामोलाचा जामानिमा केला पाहिजे. नवरा रवी तसा कितीही हुशार असला, तरी मुखदुर्बळच. अशा बहुतेक प्रसंगात बोलण्याचा जिम्मा तीच उचलायची. पण आज सुशांतची बॉस फॅमिली येणार होती. अघळपघळ गप्पा मारून चालणार नाही. नीट विचार करून बोलायला हवं. आपल्या बोलण्यात काही चूक होऊ नये, म्हणून परीक्षेपूर्वीचे 'अपेक्षित प्रश्न संच', 'संभाव्य प्रश्न' वगैरे गाईडचा अभ्यास मनातल्या मनात ती करत होती.

रवी, सुशांत आणि ती वेळेवरच हॉटेलला पोहोचले. तो पंचतारांकित थाटमाट आणि झगमगाट दडपून टाकणारा होता. सुशांतने स्वागतिकेकडे चौकशी केली आणि त्यांनी त्यांना त्यांच्या आरक्षित टेबलाकडे नेऊन बसविलं. तेवढ्यात सुशांतचा बॉस, त्याची पत्नी आणि सुशांतच्याच वयाची मुलगी असे तिघेही तिथे आले. सुशांतच्या बॉसच्या पत्नीची साडी फार भारी होती. खानदानी श्रीमंत वाटत होती. मुलीची आणि सुशांतची आधीची ओळख असावी, कारण त्याच्याशी हस्तांदोलन करताना त्यांच्या ओळखीची हिंट नीरजाने टिपली होती.
"बाबा, आई, हे माझे बॉस, त्यांच्या पत्नी आणि मुलगी." सुशांत ओळख करून देत होता.
हात जोडत नीरजाने प्रथमच त्यांना पाहिलं.
नकळत ती ओरडली,

"आँ! अद्वैत, तू?"

......समाप्त.......

Footer