बकलावा

Header2बकलावा नाव ऐकलं, तर सर्वसाधारणपणे काय येते डोळ्यासमोर? पण हे मध्यपूर्वेतील एका मिठाईचे नाव असून ती अतिशय स्वादिष्ट असते, हे समजल्यावर तिचा शोध घेणे क्रमप्राप्त होते.

बकलावा म्हणजे मध्यपूर्वेतील एक पक्वान्न. हा खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. म्हणजे मूळ कृती एकच, पण आकार वेगवेगळे. बकलावा ज्याने एकदा खाल्ले त्याला वेड लावते, अशी माहिती मिळाली. एका मैत्रिणीने तुर्कस्थानातून आणलेला बकलावा खाल्ल्यावर याचे प्रत्यंतर आले. मुंबईत बकलावा कुठे मिळतो हे गूगलबाबाच्या कृपेने समजले, तरी त्याच्या किमती पाहून देणाऱ्या असल्याने घरातच करता येईल का? याचा विचार मनात घोळू लागला.

तसे पाहिले, तर खटाटोप मोठाच आहे या पदार्थाचा, पण 'चवीचे खाणार तो शॉर्टकट शोधणार', या मी स्वतः बनवलेल्या म्हणीनुसार मी शोध घ्यायला सुरुवात केली. आणि आता बकलावा मी घरीच बनवते.

मैदा, लोणी, साखरेचा पाक, अक्रोड, बदाम, पिस्ते - विशेषतः पिस्तेच, यांची रेलचेल असलेला हा पदार्थ 'रिच' असतो. त्यामुळे कधीतरी खायला हरकत नाही, विशेषतः दिवाळीच्या सणाला करायलाही हरकत नाही.

मूळ पाककृतीत असलेल्या याच्या पेस्ट्रीशीट्स बनविण्यासाठी पीठ मळणे, आणि त्याचा शीट्स लाटणे या दोन्ही स्टेप्स कमी करून मी आता बकलावा करू लागले आहे. इच्छा झाली की तासाभरात खायला मिळतो आणि 'धन्य ती सुगरण किंवा बल्लवाचार्य ज्यांनी बकलावा बनवला असेल'असा विचार मनात येतो.

सांगते, सांगते, कृतीच सांगते आता.

साहित्य :-

  • स्प्रिंगरोल फिलोशीट्स किंवा तयार समोसापाती. (एका पॅकेटमध्ये भरपूर बकलावा तयार होतो.)
  • २ वाट्या साखर.
  • बोटभर दालचिनीचा तुकडा
  • १ वाटीभर बदाम, पिस्ता आणि अक्रोड यांची भरड पूड किंवा आवडीनुसाार कोण्या एकाची, किंवा दोघांची पूड (मी थोडेसे बदाम आणि जास्त पिस्तेच वापरते.)**
  • साधारण दीड ते २ वाट्या पातळ केलेले लोणी.

** ही पूड मिक्सरमधून करण्यापेक्षा भिजवून, साले काढून, बारीक चिरून घेतले तर दिसतेही छान आणि लागतेही छान. चिरल्यावर हा चूर एका ताटलीत ठेऊन उघडाच फ्रीजमध्ये ठेवून दिला की छान वाळतो. मग तो काचेच्या बाटलीत किंवा हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्येच ठेवायचा. हे काम निवांतपणे करून ठेवावे, म्हणजे आठवण आली की ही पूड तयार असली की चटकन काम होते.

कृती :-

१. साखरेचा दोनतारी पाक करून घ्यावा. पाक होत आला की त्यात दालचिनीचा तुकडा टाकावा.

२. ओव्हनप्रूफ डिशला ब्रशने लोणी लावून घ्यावे.

३. १ फिलोशीट त्यात अंथरावी. त्यावर पातळ केलेले लोणी ब्रशने लावावे. त्यावर दुसरी फिलोशीट अंथरून त्यावर पातळ केलेले लोणी ब्रशने लावावे. अशा रितीने सहा फिलोशीट लावून झाल्या की त्यावर सारण म्हणून तयार केलेला चुरा सढळ हाताने पसरावा. वर अंथरायच्या फिलोशीटला पातळ केलेले लोणी ब्रशने लावावे. लोणी लावलेली बाजू सारणावर ठेवून वरच्या बाजूलाही पातळ केलेले लोणी ब्रशने लावावे. वर आणखी ५ फिलोशीट्स ठेवून पुन्हा एकदा सारण घालून त्याच्यावर सहा फिलोशीट्स लोणी लावून अंथरावीत.

४. आता सुरीने हव्या त्या आकाराचे काप द्यावेत.

५. साखरेचा पाक चिरांमध्ये चमच्याने घालावा.

६. ओव्हन 180 अंशावर प्रीहीट करून घ्यावा .

७. डिश ओव्हनमध्ये ठेवून १५ ते २० मिनिटे बकलावा भाजावा.

८. घरामध्ये दरवळणारा वास शेजाऱ्यांच्या घरात जाऊ देऊ नये. वाटेकरी वाढतात. (यासाठी ओला नॅपकिन किचनमध्ये टांगून ठेवावा.)

९. १५ मिनिटांनी सुरी घालून पाहावी. स्वच्छ निघाली, तर बकलावा झाला असे समजावे. नसेल तर आणखी ५ मिनिटे ठेवावे.

१०. बकलावा थंड होईपर्यंत धीर धरावा, कारण साखरेचा पाक आणि लोणी थंड व्हायला वेळ घेतात.

११. थंड झाला की कुणाचीही वाट न पहाता आस्वाद घ्यायला सुरुवात करावी.

.

Footer