
शब्दांना नसते वय
शब्दांना कसले भय!
शब्दांना उलगडताना
शब्दातच मिळते लय!!
शब्दांत सुख आभास
शब्दांत वेदना खास!
शब्दावीण घुसमट होते
शब्दात मोकळा श्वास!!
शब्दा-शब्दांचा मेळ
शब्दांचा चाले खेळ!
शब्दांच्या नभात होते
शब्दांची चांदणवेळ!!
शब्दांतून व्हावे व्यक्त
शब्दात उरावे फक्त!
शब्दांतून देव घडावा
शब्दात मिळावा भक्त!!
शब्दांचा कैसा थाट
शब्दांची पोच अफाट!
शब्दांनी बहरुन जाते
शब्दांची पाउलवाट !!
शब्दांची पडते भूल
शब्दांत गूढ चाहूल!
शब्दांचा भ्रमर फिरावा
शब्दांत उमलता फूल!!
शब्दांत क्लेश आनंद
शब्दांत वृत्त अन् छंद!
शब्दात मोकळे व्हावे
शब्दातच व्हावे बंद!!
शब्दांस सुरांचे माप
शब्दांत तान आलाप!
शब्दांत प्रेम आईचे
शब्दात ओरडे बाप!!
शब्दातच गझल-अभंग
शब्दातच ओवी दंग!
शब्दातच फिके पडावे
शब्दात सापडे रंग!!
शब्दातच अल्ला-राम
शब्दातच भक्ती ठाम!
शब्दात फिरावे स्वैर
शब्दातच अल्पविराम!!
शब्दात अर्थ उलगडतो
शब्दाविण जन्मच अडतो!
शब्दांची पेरण होते
शब्दांचा पाऊस पडतो!!
शब्दांच्या गावा जावे
शब्दातच नित्य रहावे!
शब्दांना गुणगुणताना
शब्दांचे गाणे व्हावे!!
- केतन पटवर्धन
