दोन महिन्यांआधी अनेक वेळा अर्ध्यात सोडलेला प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले.
प्रकल्प होता स्वतःचा अँड्रॉइड अँप तयार करणे.
अनेक वेळा इन्स्टॉल करतांना आलेल्या अडचणी सुदैवाने यावेळी आल्या नाहीत आणि एकदाचा अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल झाला. सगळीकडे एक्लीप्स
वापरतात पण माझ्याकडून ते इन्स्टॉल करणे नाही जमले त्यामुळे जे होईल ते पाहून घेऊ म्हणत सरळ उडी टाकली. एखादी गोष्ट अडली कि तुनळी वर पाहायची, नाही जमले तर दुसरी गोष्ट करून बघायची असे करत करत गणनाकार, टिक टाक टो असे साधे अँप बनवले आणि काही मोठे करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यातून आठवले, एकदा पुण्यात बस पकडताना कसा ताप आला होता ते...
त्यासाठी डाटाबेस तयार करणे, लोगो बनवणे, लॉजिक बनवणे इत्यादी दिव्यांतून पार पडत आता शेवटी हे अँप तयार आहे. ते तुम्ही इथे बघू शकता. या अँप मधली प्रत्येक गोष्ट मी आयुष्यात पहिल्यांदाच केलेली असल्याने चुका असतीलच. हे अँप मी मित्रांना दिले आणि बहुतेकांना आवडलेही. परंतु मित्राला सरळ कसे सांगावे म्हणून त्यांनी चुका सांगितल्या नसतील असे मला वाटते. त्यामुळे मी इथे हा धागा काढलाय. तुम्ही अँप वापरून बघा आणि सांगा तुम्हाला ते कसं वाटतेय. त्यानुसार मी बदल करीन. प्रामाणिक टीका अपेक्षित. अँपमध्ये जेवढे टाकता येईल तेवढे फीचर्स टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसरे साधे सुधे अँप म्हणजे होकायंत्र. ते तुम्ही इथे पाहू शकता. काही अँप चुंबकीय उत्तर दाखवतात पण मी यात लोकेशन प्रमाणे बदल करून खरी उत्तर दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तरी मला फीचर्स कमी वाटत आहेत, अजून काही टाकण्याचं विचार सुरु आहेत. यात मी १० भाषांचा सपोर्ट दिला आहे. परंतु मला काहीच भाषा येतात, त्यामुळे तुमच्यापैकी काही बहुभाषिक मिपाकर असतील तर त्यांची मदत अपेक्षित आहे. असाच धागा मी रेडिट वर टाकला होता पण त्याला काही प्रतिसाद आला नाही. पण मिपा कडून तरी राक्षसाला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
टिप१:हा धागा आधीच काढणार होतो पण मोबाईल प्रकरण झाल्याने बेत समोर पडला.
टिप२: अँप टंकतांना अनुस्वार येतो, तो काढता येत नाहीये. कृपया त्याला अनुल्लेखाने मारावे (इग्नोर मारावे).