बाप्पाचा नैवेद्यः दलिया खीर

मी काही फार सुगरण नाही आणि बाप्पासाठी छान छान खाऊ करायला सुगरण असायची खरंतर गरजच नाही. दलियाची खीर आहेच अशी सहज सोपी आणि पटकन होणारी. शिवाय कोणालाही करता येईल अशी. बाप्पापण खूश आपण पण खूश.

आमच्या इथे सज्जनगडावर नेहमी हा प्रसाद असतो, सगळ्यात पहिल्यांदा ही खीर मी गडावरच खाल्ली. आता स्वत: करत असले तरी गडावरच्या खिरीची सर माझ्या खिरीला मुळीच नाही. तरी प्रयत्न चालू आहेत , त्यातलाच एक प्रयत्न या गणेशोत्सवातला इथे सगळ्यांसाठी देत आहे.

चला तर मग घ्या साहित्य

दलिया - १ कप
गूळ - १ कप (मी एक कप गूळ पावडर वापरली आहे)
तूप - २ मोठे चमचे
दूध - १ कप
पाणी - २ कप
सुके खोबरे कीस - १/४ कप
वेलदोडा पूड - ४ वेलदोड्यांची पूड
काजू - ८-१०
मनुके - १२-१५
पिस्ता पूड - ५-६ पिस्त्यांची
सजावटीसाठी स्ट्रॉबेरी

कृती -

छोट्या भांड्यात किंवा कुकरमध्ये तूप गरम करायला घ्या. त्यात मनुका, काजू आणि दलिया एकत्रच परतायला घ्या. अगदी २-३ मिनिटं मध्यम आचेवर परतून झाल्यावर यात पाणी टाका, पाणी थोडं कोमट झाल्यावर (साधारण एक दोन मिनिटात ) यात गूळ, वेलदोडा पूड, खोबऱ्याचा कीस घाला. मिश्रण ढवळून एकत्र करा. आता यात दूध घाला. परत एकदा मिश्रण ढवळा. कुकर मध्ये करत असाल आणि गॅसचा स्टव्ह टॉप असेल तर माध्यम आच करून १० - १२ शिट्ट्या करा आणि गॅस बंद करा. झाली खीर तयार.
kheer

माझा फ्लॅट टॉप इलेक्ट्रिक स्टव्ह आहे त्यात पूर्वी कुकरमध्ये खीर तळाला थोडी करपली होती (खोबरं घातलं असेल तरच करपते ). नुसतीच झाकून ठेवली तरी चांगली शिजते, मधून एक दोन वेळा खिरीचं मिश्रण ढवळलं आणि तळाला चिकटलं नाहीये याची खात्री केली की झालं. अर्ध्या तासात खीर झाली सुद्धा. गरम गरम नैवेद्य बाप्पासाठी तयार.

ही खीर गार झाल्यावरही छानच लागते. गार झाल्यावर अजून सजावट करायलाही वाव असतो. गार असताना मी टॉपिंग म्हणून पिस्ता पूड आणि स्ट्रॉबेरीज घातल्या.

kheer