माझं माहेर म्हणजे " नारळाचं खाणार त्याला देव देणार " वालं. त्यामुळे सगळ्या पदार्थात नारळ असतोच. तर गणपतीसाठी अशीच नारळात आकंठ बुडालेली रेसिपी. मणगणं
साहित्य-
१) चणा डाळ एक वाटी
२) साबुदाणा पाव वाटी
३) शेंगदाणे अर्धी वाटी
४) काजू तुकडा अर्धी वाटी
५) बदाम अर्धी वाटी
६) बेदाणे अर्धी वाटी
( वरील सर्व सुमारे तीन तास भिजत ठेवणे.)
७) एक मोठा अख्खा खवलेला नारळ
८) गूळ दोन वाट्या ( चवीप्रमाणे कमी जास्त )
९) तूप एक चमचा
१०) लवंग ४-५
११) वेलची पूड अर्धा चमचा
१२) केशर
.

.
कृती.
१) चणा डाळ, साबुदाणा , शेंगदाणा , काजू, बदाम, बेदाणे धुवून सुमारे तीन तास पाण्यात वेगवेगळे भिजत ठेवावेत.
२) शेंगदाणे, बदाम सोलून त्याचे काप करावे. (शेंगदाण्याचे दोन तुकडे करायला भारी पेशन्स लागतो. तो नसेल तर शेंगदाणे नाही घेतले तरी चालेल. आई, आज्जी, शेंगदाणे घालायच्या कारण बाकी सुका मेवा परवडत नसावा त्यामुळे ती आठवणीतली चव यावी म्हणून मी शेंगदाणे घालते.)
३) नारळ खवून, मिक्सर मधून थोडे पाणी घालून, पहिला जाड रस काढावा. परत त्या खोबऱ्यात थोडे पाणी घालून दुसरा थोडा पातळ रस काढावा.
४) भिजलेली डाळ, साबुदाणा , शेंगदाणे, बदाम आणि काजू यामध्ये नारळाचा पातळ रस घालून कुकरमध्ये शिजायला ठेवावे. (वेगळे पाणी घालू नये.) शिजताना डाळ उतू जाते म्हणून भांड मोठे आणि उभे घ्यावे. आणि रस जास्त घालू नये. साबुदाणे असल्यामुळे डाळ छान एकजीव होते.
५) एक जाड बुडाचे भांडे गॅस वर ठेऊन ( गॅस पेटवून:)) त्यात चमचाभर तूप घालावे. ते गरम झाले की लवंगा घालाव्या. त्यात लगेच शिजवली डाळ, काजू बदाम वगैरे ओतावे. त्यात गूळ, मनुका वेलची केशर घालून जरा उकळी काढावी . नारळाचा पातळ रस उरला असेल तर तोही घालावा, ( गुळाचे प्रमाण ज्याच्या त्याच्या चवीनुसार कमी जास्त.)
६) छान शिजल्यावर गॅस बंद करावा आणि नंतर त्यात नारळाचा जाड रस घालावा. झाले मणगणं तयार. गार किंवा गरम दोन्ही छान लागते.
.
