श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ४ : एका अनोळखी जगातला प्रवास.

एका अनोळखी जगातला प्रवास.

अनिवासि

लेखमालेसाठी काय लिहावे ह्याचा विचार करत असताना इतके प्रसंग डोळ्यापुढे आले की निवड करणे कठीण झाले.
तेव्हा जेथून माझ्या आयुष्यातल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आणि ज्याचे सूतोवाच मी एका प्रतिसादातून केले होते, तेथेच जातो.

१९-२०व्या वर्षापर्यंत माझे आयुष्य पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात गेले.
५० साली शालान्त परीक्षा पास झालो, रीतसर कॉलेजला प्रवेश घेतला आणि त्या वेळच्या इंटरपर्यंत वाटचाल केली. सर्व काही आलबेल होते आणि ----
एकाएकी घरात आर्थिक आपत्ती आली. (तो निराळा विषय). कॉलेजची फी थकली, परीक्षेसाठी फॉर्म भरायलासुद्धा पैसे नव्हते. माझे आणि मोठ्या भावाचे कॉलेज संपले. त्याने एकदम भारतीय हवाई दलाचा रस्ता धरला. मी नोकरीच्या शोधात मुंबई गाठली. माझे एक चुलत आजोबा त्या वेळेस मुंबईत भुलेश्वरला राहत होते. अस्मादिक तेथे अवतरले. नशीब काढायला मुंबईत येणारे इतरही नातेवाईक / मित्र त्यांच्याकडे कायम येत असत आणि तेसुद्धा असेच कनिष्ठ मध्यमवर्गातले. पहिल्याच दिवशी त्यांच्या मोठ्या कर्त्या मुलाने सांगितले "झोपायला गॅलरीत जागा, आघोळ-संडास इ. वापरायला परवानगी. बस. चहा, जेवण स्वतःची व्यवस्था करावयाची."

सुदैवाने लवकरच एका इन्शुरन्स कंपनीत - वडलांच्या ओळखीने - नोकरी मिळाली. पगार महिना ९० रुपये. पैसे वाचवण्यासाठी शक्यतो सगळीकडे चालत जाणे असावयाचे. तांब्यांच्या खानावळीत महिन्याच्या जेवणाचे सत्र सुरू झाले. ठाकूरद्वारहून फिरोजशहा मेहता रोडपर्यंत चालणे वेळ घालविण्याचे साधन होते. संध्याकाळी काम संपल्यावर चर्नी रॊड चौपाटीवर घरी जायची वेळ होईपर्यंत! पुरा वैतागलो होतो. ऑफिसकाम केले होते, पण नोकरी म्हणून नाही. जेवणाचे पैसे, वडलांना थोडे पैसे व एक दोन-वेळा पुण्याचा प्रवास - शिल्लक ०.
मधल्या काळात घरी अनेक गोष्टी होत होत्या. धाकट्या भावंडांची शिक्षणे, त्यांचे कपडे इ.नी वडील पार थकून गेलेले असणार हे आता समजते.
अशा वेळेस परदेशात नोकरी करून अभ्यास करता येतो असे ऐकले. माहिती काढावयास सुरुवात केली. काहीही करून पैसे मिळवायचे. जेथे जेथे शक्य होते तेथे पत्रे, अर्ज टाकावयास सुरुवात केली. पर्शियन गल्फ, बोर्निओ अशा ठिकाणीही अर्ज केले, पण उपयोग झाला नाही. इंग्लंड व अमेरिकेतील माहीत नसलेल्या मराठी लोकांनाही पत्रे टाकली. त्यातल्या इंग्लंडमधील दोन जणांनी उत्तरे दिली. त्यातल्या एकानी भरपूर उपयोगी माहिती दिली . इंग्लंडला जायचा विचार केला आणि सगळे जण हसत होते. कॉलेजला फी भरायला पैसे नाहीत आणि इंग्लंडच्या बाता!! घरून काही मिळणार नाही हे नक्कीच होते, तेव्हा वडलांचे एक मित्र मुंबईचे श्री काका तांबे (तांबे उपाहारगृहाचे प्रणेते) ह्यांच्याकडे गेलो. काका सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर होते. त्यांनी सर्व ऐकून घेतले आणि पुण्याच्याच एका गृहस्थांचे नावे सुचविले. त्यांनी आणखी एकाचे नाव सुचविले - अशा तऱ्हेने ७-८ मान्यवर लोकांना भेटलो, पण प्रत्येक ठिकाणी तेच - सॉरी! शेवटच्या गृहस्थांना हा माझा 'प्रवास' माहीत नव्हता, त्यांनी काका तांब्यांचे नाव सुचविले, परत एकदा काकांना तोच पाढा वाचून दाखविला. काका मला घेऊन मुंबईच्या ब्राह्मण समाजात गेले व त्याच्या सांगण्यावरून मला २००० रुपयाचे कर्ज मंजूर झाले.
आतापर्यंत 'मी मी' झाले, परंतु हे सर्व वडलांच्या मुळेच झाले. त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण त्यांच्या सार्वजनिक कामामुळे त्यांना समाजात मान होता आणि त्यामुळेच हे सर्व झाले.

पैसे मिळाले पुढे काय? कुणालाच ह्या प्रवासाची माहिती नव्हती. परत एकदा मुंबईला थॉमस कुक कंपनीत चौकशीला गेलो. माझ्याकड़े पाहून त्यांना काय वाटले असेल कुणास ठाऊक? पासपोर्टची माहिती नाही, कुठे जाणार ठाऊक नाही आणि इंग्लंडच्या तिकिटाची चौकशी!! असो. त्यांनी माहिती दिली. पासपोर्ट विनासायास मिळाला. त्या वेळेस विमान प्रवास फक्त अतिश्रीमंत लोकांसाठी होता. तेव्हा बोटीची चौकशी केली. P.& O कंपनीच्या बोटी ऑस्ट्रेलियावरून येत. १८ सप्टेंबर १९५२ला SS Maloja येणार होती व लगेच लंडनला जाणार होती. तिकीट काढले.
पुलंनी अपूर्वाईचा विचारही केला नसेल तेव्हा आमची कपड्यापासूनची तयारी सुरू झाली. अर्धी चड्डी, मांजरपाटाचा शर्ट, नंतर पायजमा व एकदा कधीतरी फुल पॅन्ट हा आतापर्यंतचा आमचा कपड्यांचा प्रवास. हे सर्व आमचे पिढीजात टेलर - श्री पराडकर शिवत. पुण्यात सिटी पोस्टासमोर त्यांचे दुकान होते. तेथे आम्ही फक्त वडलांचे निरोप द्यायचो. ह्या वेळेस स्वतःचे पैसे घेऊन, निराळे कपडे घेणार होतो. आतापर्यंत माझया इंग्लिश स्वारीची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. मोठ्या रुबाबात एक सूट व दोन शर्ट ऑर्डर केले. थंडीच्या दिवसात लंडनला gabardeenचा मऊ सूट!!! त्यांनी विचारले, “कॉलर शेक्सपिअर कट करू?” कॉलरचीही फॅशन असते, हे त्या दिवशी कळले. नवीन जगात पावले हळू हळू पडत होती.

परदेशात तसे जाऊन आणि राहून आलेले लोक काही फारसे भेटत नव्हते. जे कोणी भेटले, ते एक तर श्रीमंत उचभ्रू होते किंवा चार-आठ दिवसाचा प्रवास करून आलेले. त्यांच्याकडून माहितीची अपेक्षा करणे चुकीचे होते. एकाने सांगितले की "तुम्हाला कमीत कमी ७-८ सूट तरी लागतील. मॉर्निंग सूट, इव्हनिंग सूट, स्मोकिंग जॅकेट वगैरे वगैरे..." मला एक सूट घेताना मारामार झाली होती. दुसरे एक नुकतेच जाऊन आले होते. त्यांच्याकडे त्यांनी तिकडे घेतलेला ओव्हरकोट होता. त्यांनी तो मला 'स्वस्तात' विकत देऊ केला. त्यांची स्वस्त किंमत ऐकून मला मुंबईतच थंडी वाजू लागली.
असे करता करता निघण्याची वेळ आली. बाकी सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या. ४-५ दिवस अगोदर पुण्यात सत्यनारायण झाला. बरेच शिक्षक व मित्र आले होते. त्या दिवशी माझ्याकडे एक सूटकेस व त्यात एक शर्ट होता. पुढच्या एक दिवसात अनेक जणांनी त्यांच्या नवऱ्यासाठी, मुलासाठी, मित्रासाठी सामान आणून देण्यास सुरुवात झाली. १ किलो तांदूळ, साखर, चड्डीला लावायची बकल्स, चहाचे पुडे, खोबरेल तेलाच्या बाटल्या (ज्या मी नेल्या नाही) जवळजवळ दोन सूटकेसेस भरल्या. शेवटल्या मिनिटाला कोणीतरी म्हणाले, “इतक्या लांब होल्डऑलशिवाय कसा जाणार?” आतापर्यंत हे कोणीच बोलले नव्हते. झाले. शेवटाच्या मिनिटाला एक होल्डऑल विकत आणला.
पुण्याहून निघालो. मुंबईला येऊ न शकणारे मित्र स्टेशनवर आले होते. मुंबईला सरदारगृहात राहिलो. मुंबईत वडलांचे एक मित्र भेटायला आले. त्यांनी होल्डऑल बघितला आणि ते हसायला लागले. त्यांनी परदेश प्रवास केलेला होता. एक डाग कमी झाला. १५-१६ तारखेला केव्हातरी टाइम्स वाचत असताना p & O कंपनीची जाहिरात पाहिली. मलोजा बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी त्यांचे सामान १७ तारखेपर्यंत धक्क्यावर आणून पोहोचवावे व मेडिकल चेकअपसाठी हजर व्हावे.
मग काय - नुसती धावपळ. सामान पोहोचवले. दुसऱ्या दिवशी आई, वडील व धाकटी बहीण पुण्याहून आले. त्या मोठ्या बोटीवर चढलो. काका तांबेसुद्धा आले होते. हारतुरे दिले. प्रवाशांशिवाय इतरांनी उतरावे असा इशारा झाला. आई-वडील वगैरे उतरले. ज्यांना वर येता आले नव्हते, असे मित्र खालूनच हात करत होते.
बोट सुटली..... इतर प्रवासवर्णनात वाचल्याप्रमाणे मला काही गलबलून वगेरे आल्याचे आठवत नाही. नव्या अनोळखी जगाचे वेध लागत होते.
पण....
ही माझी आणि वडलांची शेवटचीच भेट आहे असे स्वप्नात तरी मला वाटले असते, तर?

(वरील सर्व थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. जून ते सप्टेंबर चार महिने खूप घडामोडीचे होते. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. ८ ऑक्टोबरला लंडनला पोहोचलो आणि खरा प्रवास सुरू झाला तो ६५ वर्षे सुरू आहे.)