श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ३ : फोडणी पहावी टाकून, अर्थात 'संगीत गोईंग डच'

एक

"कैसा है?" मी मोठ्या उत्सुकतेने विचारलं.

मित्राच्या गोरटेल्या आसामी चेहर्‍यावर कसेनुसे भाव आले होते. त्याने मान डोलावली आणि ब्रेडचा तुकडा तोंडात कोंबून घटाघट पाणी प्यायलं.

अजून लैच मोठा टप्पा गाठायचाय याची जाणीव झाली.

---

दोन

सगळं स्थिरस्थावर असताना वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी परदेशात जाऊन उच्चशिक्षण घ्यावं अशी भलतीच कल्पना डोक्यात आली. घरच्यांना पटवणे, वेड्यावाकड्या वेळा असलेली नोकरी सांभाळून युनिव्हर्सिट्यांना अर्ज करणे, पैशाची चिंता वाहणे यात सहा महिने गेले. 'केल्याने होत आहे रे' या उक्तीचा प्रत्यय देणार्‍या काही अविश्वसनीय घटना घडत गेल्या, आणि माझ्या व्यावसायिक क्षेत्रातल्या अग्रगण्य विद्यापीठात वर्षभरासाठी मास्टर्स करण्यासाठी आवताण आलं. नोकरीचा नोटीस पिरियड, पीएफ सोडवून घेणे, शैक्षणिक कर्जाची व्यवस्था करणे, व्हिसा मिळवणे या गोष्टींमध्ये आणखी दोन महिने गेले आणि बघता बघता निघायची तारीख दोन दिवसांवर आली.

वर्षभर नेदरलँड्समध्ये राहून आलेला मामेबहिणीचा नवरा खास भेटायला आला. त्याने टिप्सचा खजिना उघडा केला. सिन्सियर विद्यार्थ्यासारख्या त्या सगळ्या टिप्स मी टिपून घेतल्या.

"सगळी ग्रोसरी तुला अल्बर्ट हाईनमध्ये मिळेल. पण लिडल आणि आल्डी जास्त स्वस्त असतं. पण आपल्या देसी ग्रोसरीसाठी देन हागमधल्या एका दुकानाचा पत्ता देतो..."

मी पुढचं काहीच ऐकून घेतलं नाही. ग्रोसरी. हा मुद्दाच माझ्या ध्यानात आला नव्हता! आजवर जेवण हे आई, बायको किंवा वेटर या अन्नदात्या त्रिमूर्तींपैकी कोणीतरी आपसूक पानात आणून वाढलं होतं. ते बनवायला लागतं, आणि ते चविष्ट असलं तरच घशाखाली उतरेल हे सत्य फाडदिशी कानाखाली वाजलं.

मामेबहिणीच्या नवर्‍याच्या सल्ल्याने त्याच संध्याकाळी राईस कुकर घेतला.

"नावावर जाऊ नकोस. यात पोळ्या सोडून सगळं होतं. चहासुद्धा." मा० ब०च्या न० ने धीर दिला. इथे च्यायला चहा सोडून शिजवायला मुळात येत काय होतं? पण उगाच दाजींसमोर इज्जत डौन नको व्हायला म्हणून मी पण आत्मविश्वास दाखवत मान डोलावली.

[अवांतरः हे दाजी फारच लोकोत्तर पुरुष आहेत. गावगन्ना एकटेच भटकत असतात पण सूद्द साकाहारी आहेत. नुकतेच ते कोरियाला गेले होते. तिथेही आपला शाकाहारी बाणा जपला असणार याची पूर्ण खात्री आहे.]

उरलेल्या दोन दिवसांत आईला मुगाच्या डाळीची खिचडी शिजवताना नीट पाहिलं. पण आणखी काही शिकायला वेळ नव्हता.
-----

तीन

एका सकाळी डोळे उघडावेत आणि आपण अगदी परक्या मुलखात एकटेच आहोत ही जाणीव होणं जबरदस्त प्रकार असतो. आधीच्या प्रवासांतही ती झाली होती, पण खांडव्याला किंवा राजनांदगावला डोळे उघडणं आणि अॅम्स्टरडॅमला डोळे उघडणं यात फरक आहे. अॅम्स्टरडॅम / लायडेनचं पहिलं दर्शन आणि पहिल्या आठवणी हा एका स्वतंत्र नॉस्टॅल्जियायुक्त लेखाचा विषय आहे. पण इथे इतकंच सांगतो - "इथेही आकाश निळंच आहे आणि टोमॅटो लालच आहेत!" असा वेडसर विचार मनात आल्याचं अगदी स्पष्ट आठवतं!

लायडेन सेंट्राल स्टेशनावर रूममेट घ्यायला आला होता. अर्थातच त्याला आधी भेटलो नव्हतो, दोनदा फोनवर बोलणं झालं होतं. त्यात तो आसामी (म्हणजे आसाम राज्यातला) आहे एवढं लक्षात आलं होतं. त्याने रूमवर नेऊन एक रस्साभाजी खाऊ घातली. फारसा विचार न करता मी झोपून गेलो तो थेट पंधरा तासांनी उठलो.

रूममेट मस्तच माणूस होता. आमची दोस्ती जमायला वेळ लागला नाही. (आता यापुढे त्याचा उल्लेख 'मित्र' असा करेन.) जवळपास माझ्याच वयाचा, पण जगातले अनेक देश एकटाच फिरून आला होता. मला आश्चर्यच वाटलं. त्याचं असं होतं, की त्याचे वडील एअर इंडियात पायलट होते (आहेत). त्यांना मिळणार्‍या फुकट तिकिटांवर हे बाबाजी जग फिरून आले होते. आपल्या तरूण मुलाला थोडे पैसे देऊन नवख्या देशांत एकट्यालाच सोडून देणार्या पालकांचं मला कौतुक वाटलं. त्याच्या पालकांच्या महानतेबद्दल पुढे येईलच.

आम्ही बसून एकत्र राहायचे 'ग्राऊंड रूल्स' बनवले. बाथरूमचा वापर, रूमची साफसफाई, इंटरनेटचे पैसे वगैरे.

"खाने का कैसे करना है?" मी अंतरीचा प्रश्न विचारला.

"थोडा घर पे पकाएंगे, थोडा बाहर खाएंगे." मित्रोबा चांगलेच निवांत दिसत होते. "जब घर पे करेंगे, एक जन पकाएगा दूसरा बर्तन मांजेगा..."

"तुम्हें पकाना आता है?"

"बिलकुल आता है! बचपन से. क्यों, तुम्हें नहीं आता?"

"..."

---

चार

पहिला आठवडा नाही म्हटलं तरी बरा गेला. घरून आणलेले म्यागी, हार्लेमरस्त्रात (लायडेनचा लक्ष्मी रोड) वर सापडलेलं एका आर्मेनियन गृहस्थाचं कबाब केंद्र आणि मित्रोबांचं आसामी पद्धतीचं भोजन यामध्ये बरं चालू होतं.

"तुम्हें इतना सबकुछ पकाना कैसे आता है?" इमाने इतबारे बर्तन मांझत मी एक दिवस त्याला विचारलं.

एअर इंडियापूर्वी याचे वडील भारतीय वायुदलात होते. वेगवेगळ्या तळांवर बदल्या होत असत. वडिलांची फार इच्छा की यानेही पायलट व्हावं. त्यासाठीच्या लाईफ स्किल्सचं ट्रेनिंग त्याला ते लहानपणापासून देत असत. त्यातलं एक लाईफ स्किल "स्वतःचं स्वत: शिजवून खाता आलं पाहिजे!" हे होतं. त्यासाठी त्यांनी एक अघोरी उपाय केला. "घरातलं मूल बारा वर्षांचं झालं की आठवड्यातला एक दिवस त्याने ब्रेकफास्ट रांधायचा. सगळ्यांसाठी."

पदार्थ कोणते करायचे याला काही बंधन नव्हतं. अगदी ऑम्लेटसुद्धा चालेल. फक्त ते सगळ्यांच्या पोटभरीचं झालं पाहिजे एवढीच अट होती.

"और नहीं किया तो क्या होगा?" मी माझ्या व्यवसायाला शोभेशी शंका काढली.

नाहीतर सगळ्यांना उपास. आता, त्या उपासाचा उपद्रव मुलांनाच सर्वात जास्त होणार आहे हे उघड होतं. वडील बेसवरच्या कँटीनमध्ये पाहिजे ते खाऊन पोट भरतील, आणि पोरं शाळेत कटली की आई जवळच्या कुठल्यातरी हॉटेलात जाऊन चरून येईल. पण पोटभरीचा ब्रेकफास्ट न शिजवणारं पोरगं मात्र लंचपर्यंत उपाशी बसेल.

वयाच्या बाराव्या वर्षी भुकेने काय अवस्था होत होती हे आठवल्यावर हा प्लॅन किती अभेद्य होता याची जाणीव मला झाली.

"तेरेवाला खिला कभी! मुझे तुम्हारे मराठी डिशेस भोत पसंद है. वो क्या होता है - पोहा. और उसल..."

माझ्या काळजात चर्र झालं. पण या इन्स्पायरिंग ष्टोरीमुळे इन्स्पायर न होतो तरच नवल. दुसरं म्हणजे नवेनवे अनुभव उरावर घ्यायचे ते दिवस होते. आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे असं वाटवणारे. उसल क्या चीज है...

"आज मैं खिलाता तेरेको. हमारा आलू का रस्साभाजी खिलाता. एकदम मराठी स्पेशल..." मी आश्वासन दिलं.

---
पाच

लहानपणी 'ज्वलज्जहाल मिसळ' फेम रामनाथ हॉटेलच्या पाठिमागे आम्ही रहात होतो. संध्याकाळी साडेआठच्या सुमारास रामनाथचा नाथ खन्ना नवी तर्री बनवायला घेत असे. त्याचा दरवळ आख्ख्या गल्लीत पसरे. वासावरूनच ती किती हेवी ड्युटी असू शकेल याचा अंदाज यायचा. ती तर्री प्रत्यक्ष खायचा धीर व्हायला अनेक वर्षं गेली.

नेमका तसाच वास माझ्या रस्साभाजीतून निघाल्यावर त्या बिचार्या अहोमियाच्या ताटात काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना मला आली. नवख्यांना खन्ना नेहेमी बरोबर ताक घ्यायला लावतो. त्याची आठवण होऊन मी त्वरित ताक घुसळलं. कोणतं ज्ञान कुठे उपयोगी पडेल काही सांगता येत नाही.

मित्रोबा अगदीच झंटलमन असल्याने त्याने तो प्रकार खाल्ला. दोन ग्लास ताक प्यायल्याचं माझ्या नजरेतून सुटलं नाही. फोडणीतली मोहरी जळली होती. जेवढं लाल तिखट घातलं होतं त्याच्या एक तृतियांशच घालणं योग्य होतं. कांदा चिरण्यात सफाई येणं गरजेचं होतं.

"मैं सिखाता कल से.." एवढंच बोलून त्याने बर्तन मांझून टाकले.

---

सहा

- पाककृती ही स्टेप बाय स्टेप वाचून करायची निर्बुद्ध गोष्ट नव्हे. एखादा पदार्थ खाताना तुला त्यातलं काय आवडलं होतं ते आठव, आणि ते कसं आणता येईल याचा विचार कर. उलटीकडून विचार कर.

- एखादं साहित्य नसेल तर डगमगून जाऊ नकोस. पर्याय शोध.

- गॅस सुरू करायच्या आधी चिराचिरी पूर्ण झालेली असली पाहिजे.

- तेल धुरावल्यावरच त्यात मोहरी टाक. गारेगार तेलात मोहरी टाकून ती कधी तडतडेल याची वाट बघत बसू नकोस.

- गरम तेलात हळद घालशील तर ती जळेल आणि सगळी चव खराब होईल.

- लसूण घालताना उलथन्याच्या उलट्या बाजूने तो ठेच आणि मग घाल. त्याने त्यातला रस चट्कन बाहेर येतो.

- कुकर लावताना झाकण पाण्यात भिजवून मग लाव. म्हणजे रिंग बराच काळ टिकेल.

- दह्या-ताकाला जिर्याची फोडणी. बाकीला मोहरीची.

- फोडणीसाठी तेल तापवायचं तीव्र आचेवर, पदार्थ शिजवायचा मध्यम आचेवर आणि तळातळी करायची मंद आचेवर.

- पदार्थ तिखट झाला तर त्यात लिंबू पिळायचं.

- पदार्थ शिजताना वेळ मिळतो. त्यात पुढच्या पदार्थाची तयारी करायची. अगदीच काही नसेल तर ओटा पुसायचा, एखादं तरी भांडं घासून टाकायचं.

- ... वगैरे.

---

सात

श्रीगुरूसारखा असता पाठिराखा, इतरांचा लेखा कोण करी? तरबेज होऊ लागलो, आत्मविश्वास येऊ लागला. राईसकुकरमध्ये खरंच पोळ्या सोडून सगळं करता येतं याची प्रचिती आली. काही चुकलं तर गुरुदेव मागे उभे होतेच.

दसर्याला युनिमधल्या भारतीय मित्र-मैत्रिणींना बोलावून मटार उसळ खिलवली. सोबत शेवयांची खीर. मैत्रांचा आवाका अखिल भारतीय होता. 'गुलाल' सिनेमातून नुकताच बाहेर आला असावा असं वाटणारा एक राजस्थानी, एक पिव्वर व्हेज गुजराथी मुलगी, तितकीच पिव्वर नॉनव्हेज हरियाणवी मुलगी, पलिकडच्या खोलीत राहणारा केरळी कॅथलिक, मित्रोबा आसामी आणि मी मराठी. मंडळी तुडुंब जेवली.

बोलता बोलता कढीचा विषय निघाला. एकच पदार्थ, ढोबळमानाने एकच पद्धत, पण हर प्रांताची न्यारी कढी. पकोडे सोडलेली हरियाणवी कढी, जवळजवळ त्यासारखीच पण मोहरीच्या तेलात केलेली अहोमिया कढी, गुळमाट गुजराथी कढी आणि आपली मराठी कढी. मलाच मराठी कढीचे तीन प्रकार आठवत होते: लसूणमोहरीचं वाटण लावलेली पिवळी दक्षिण महाराष्ट्रीय कढी, कोणत्याशा सणाला करतात ती पडवळ घातलेली पांढरट कढी (भिकार लागते: जनहितार्थ जारी) आणि वेगळ्या कृतीची सोलकढी. मग पुढे महिनाभर आठवड्यातून एका दिवशी अखिल भारतीय कढी महोत्सव भरवण्यात आला.

ही टीम जमलीच. एकदा पन्नास माणसांचा स्वयंपाक करण्याचा घाटही घातला होता. युनितल्या आख्ख्या वर्गाला दिवाळी पार्टी दिली तेव्हा सगळ्यांनी मिळून पावभाजी केली होती. युरोपियन जिभांसाठी सपकवाली आणि अन्य जिभांसाठी मसालेदार. पण 'स्पायसी डिलिशियस इंडियन फूड'ची जाहिरात इतकी झाली होती की मसालेदार पावभाजीचा चट्टामट्टा झाला, आणि संयोजकांना सपक पावभाजीवर कांदालसूणमसाला घालून घ्यायला लागला!

वर्षाच्या अखेरपर्यंत आत्मविश्वास फसफसायला लागला होता. एका 'ब्रिंग युवर ओन फूड' बार्बेक्यू पार्टीसाठी 'चिकन दो पियाजा' वगैरे यशस्वीपणे करण्यापर्यंत मजल गेली. या प्रकारात कांद्याचा दोन प्रकारे वापर होतो हे आधी लक्षात आलं नव्हतं.

दहा महिन्यांनंतर घरी गेलो तेव्हा तमाम कुटुंबाला बसवून त्यांच्यासाठी बटाटेवडे तळले. पत्नी खूष झाली. आई कृतकृत्य.

"काय गं आई," मी विचारलं. "स्वयंपाकातला अर्धा स देखील येत नसताना तू मला दूरदेशी पाठवलंच कसं? काळजी नाही वाटली का की बुवा हा काय जेवेल?"

"तू उपाशी राहणार नाहीस याची खात्री होती..." माझ्या सुटत चाललेल्या पोटाकडे बघत आई थंडपणे म्हणाली.

Touché!

---
आठ

हे सगळं एकदा जॅक डनियल्सला सांगत होतो. त्याने त्याच्या एका मास्तरांची आठवण सांगितली. ते म्हणायचे की जर केमिस्ट्री शिकायची असेल तर स्वयंपाक शिका. खरं आहे एकदम.

गरज म्हणून सुरू केलेला स्वयंपाक 'दिवसांतलं एक वैतागवाणं काम' न राहता आनंददायक गोष्ट म्हणूनच समोर आली, हे श्रेय निस्संशय शिकवणार्‍याचंच. आता हौस म्हणून स्वयंपाक करतो. प्रयोग करतो. निम्म्यापेक्षा जास्त फसतात, पण आता किमान फोडण्या तरी जाळत नाही. स्वतःच्या पाककृती एका वहीत लिहून ठेवतो.

मिपावरच्या अन्नपूर्णा आणि बल्लव; विशेषतः पेठकरकाका हाटेलवाले, दीपक कुवेत पनीरवाले, केडीभाऊ एअरफ्रायरवाले यांच्याकडे बघून शिकतो आहे. आता पाकृचा शो दिसला तर चॅनेल बदलत नाही. घरात पाकृंच्या पुस्तकांची भर पडली आहे.

एकेकाळी चवीबाबत फार आग्रही होतो. एखादा पदार्थ पाहिजे त्या चवीचा झाला नसेल तर फाड्कन तसं बोलून दाखवायचो. (शिवाय तरूण था मय.) कित्येक माऊल्या या बळंचकर स्पष्टवक्तेपणामुळे दुखावल्या गेल्या असतील. पण आता समजतं की 'ती' चव बरोब्बर आणण्यासाठी पार्श्वभागाला किती मोड येतात ते. आता थोडं इकडेतिकडे झालं तर सोडून देतो.

एक अतिशय समाधानाची गोष्ट म्हणजे माझा मुलगा स्वयंपाकघरात लुडबुड करतो. हाताखालची कामं करतो. "अमुकमध्ये तमुक घातलं तर काय होईल?" वगैरे प्रश्न विचारतो. मला एक चांगला गुरू भेटला - प्रत्येकालाच भेटेल याची काय शाश्वती?

-- x --