क्ष.
माझा चौथीपासूनचा मित्र. खरं तर तो आमच्या वर्गात आहे, हे सातवीला गेल्यावर कळलं आणि आठवीला आमची ओळख चांगली झाली. मित्र म्हणावा इतपत.
हडपसरला एका झोपडपट्टीत पत्र्याच्या दोन खोल्यांचं घर. घरात आई, वडील आणि क्षचे दोन भाऊ. आई दोन-चार घरी घरकाम करायची. वडील लोकसेवा हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर पोतं टाकून चपला व बूट शिवायचा व्यवसाय करायचे. मोठ्या भावाने सहावी-सातवीनंतर शाळा सोडलेली, तो एका गवंड्याच्या हाताखाली जायचा.
आमच्या शाळेत चौथीच्या व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं खूप महत्त्व असायचं. इतकं, की चौथीच्या आणि सातवीच्या वर्गावर इतर विषय कमी आणि बहुतेक वेळ मराठी, गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास चालू असायचा. प्रत्येक इयत्तेत ऐंशी विद्यार्थी असायचे, त्यातले चाळीस जण शिष्यवृत्तीसाठी निवडलेले असायचे 'अ' तुकडीमध्ये.
तर, क्षचीसुद्धा चौथीला या अ तुकडीमध्ये निवड झाली होती. पण त्याने जास्त अभ्यास नको म्हणून ब तुकडीतच राहण्याचा आग्रह धरला. आमचे शिक्षक, जे बहुतेक सेवाभावी, निरपेक्ष वृत्तीने शिकवणाऱ्या शेवटच्या पिढीतले असतील, त्यांना वाईट वाटलं. अखेर सातवीला मात्र त्यांनी त्याला अक्षरशः शाळेतून काढायची धमकी देऊन 'अ ' तुकडीमध्ये घेतला. त्याने मनाविरुद्ध वर्षभर अभ्यास करून महानगरपालिका शाळांमध्ये पहिला, जिल्ह्यात सातवा व राज्यात सेहेचाळिसावा क्रमांक मिळवला!!
आठवी ते दहावी मात्र त्याने मनापासून अभ्यास केला आणि म्हणूनच आमच्या टॉपर-ग्रूपमध्ये आम्ही त्याला येऊ द्यायचो. दहावीला त्याचा शाळेत पहिला नंबर आला... साडेएकोणनव्वद टक्के! परत एकदा महानगरपालिका शाळांमध्ये तो पहिल्या पाचात होता.
मध्यंतरी घरी बऱ्याच अडचणी वाढल्या होत्या. वडिलांचा व्यवसाय व आईचं काम यातून 'खाऊन पिऊन सुखी' असलेल्या घरात वडिलांच्या व्यसनाचं ग्रहण लागलं. आम्ही आठवीला असताना एकदा क्ष आठवडाभर शाळेतच आला नाही. मित्रांपैकी दोघे-तिघे त्याच्या घरी चौकशीला गेले, तेव्हा कळलं की त्याच्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मग त्यांचे उपचार, पोलीस केस यामुळे क्षची शाळा बुडाली होती. आम्ही नववी-दहावीला असताना लग्नसराईच्या सीझनमध्ये शाळेची वेळ १२ ते ५.३० असताना तो थेट अडीचला शाळेत यायचा. आम्हाला कुणालाच माहीत नव्हतं की तो कुठे गायब असायचा. पण शिक्षकसुद्धा त्याला काही बोलत नसत. पुढे कळलं की तो जवळच्या एका मंगल कार्यालयात वाढप्याचं काम करायला जायचा. ६० रुपये हजेरीने महिन्याला अठराशे रुपये कमवून घरी द्यायचा. कधी कधी रात्रीचा एखादा रिसेप्शनचा कार्यक्रम असेल तर ते पैसे एक्स्ट्रा मिळायचे.
अकरावीला व बारावीला हडपसरच्याच कॉलेजला होता. बारावीला कॉलेजात पहिला आला आणि पीसीएम ग्रूपला ९३% मिळाले. मेरिटवर (अनुसूचित जातीच्या आरक्षणातून) सीओइपीमध्ये कॉम्प्युटरला ऍडमिशन मिळाली. इकडे तिकडे किरकोळ कामं सुरूच होती. पहिल्या वर्षी ६२% मिळाले आणि त्याने ड्रॉप घेतला!!
अकरावी-बारावीला एका स्थानिक चांगल्या दर्जाच्या खाजगी क्लासचालकाने त्याची हुशारी हेरून त्याला विनाशुल्क क्लासमध्ये घेतलं होतं. पुढे इंजीनियरिंगलासुद्धा तो त्या सरांच्या संपर्कात होता. त्या सरांना हे ड्रॉपचं कळलं.
त्यांनी क्षला बोलावलं आणि कारण विचारलं. तो म्हणाला, “सर, इंजीनियर झाल्यावर हजारो रुपये मिळायचेत तेव्हा मिळतील. आता मला घर चालवणं जास्त महत्त्वाचंय. आता एका ठिकाणी सोसायटीत हेल्परची कामे करून महिन्याला तीन हजार पगार मिळतोय. तीन वर्षांनी मिळणाऱ्या हजारो रुपयांसाठी मी आताचे तीन हजार नाही सोडू शकत. मला माझ्या घरातलंय लोकांची पोटं भरायचीत.”
सर म्हणाले, “तीन हजार मी तुला देतो. वाटल्यास मला क्लासमध्ये पेपर तपासायला मदत कर आणि त्याचा पगार समजून पैसे घे, पण इंजीनियरिंग सुरू ठेव.” अशा पद्धतीने क्षचं क्लासमधलं काम सुरु झालं, जे पुढे बीई होईपर्यंत सुरु होतं. यथावकाश आमचा क्ष बीई झाला. अर्थात, अपेक्षेप्रमाणे (एका ड्रॉप वर्ष पकडून) बाकी थ्रू-आऊट ऑल क्लिअर आणि प्रथम श्रेणी होती. शेवटच्या वर्षी ६८% होते.
कॅम्पस प्लेसमेंटमध्ये एका कंपनीने त्याला निवडलं. त्याला पगाराची अपेक्षा विचारली. त्याने सांगितलं, “मी तीन हजारासाठी इंजीनियरिंग सोडलं होतं. तुम्ही द्याल तो पगार चालेल.”
चार वर्षं फक्त कॉलेज व घर चालवणं एवढं केल्याने मार्केटमध्ये काय चालू आहे काहीच माहीत नव्हतं त्याला.
कंपनीने त्याला साडेतीन हजार देऊ केले. त्याने ती नोकरी स्वीकारली. पुढे कंपनीने त्याचं काम पाहून तीन महिन्यांनी त्याला पंधरा हजार पगार सुरू केला. पण 'मार्केट' मध्ये आल्यावर त्याला पगार किती असू शकतो त्याचा अंदाज आला आणि त्याने नोकरी बदलली. पगार वाढला. मग दोन-तीन वर्षांनी नोकरी बदलत राहिला.
सध्या क्ष पुण्यातल्या एका मोठ्या व प्रतिष्ठित आयटी कंपनीत नोकरी करतो. दोन वर्षांपूर्वी त्याला वीस लाखाचं पॅकेज आहे, असं सांगत होता. लग्न केलंय. बायको आवर्जून उच्चशिक्षित व अतिगरीब घरातली केलीय. तो बायको व एका मुलगी यांच्याबरोबर एका वन बीएचकेमध्ये राहतो. पहिल्या नोकरीत एक पल्सर घेतली होती, ती आणि हौस म्हणून एक वापरलेली वॅगन आर घेतली होती, त्याला आता सात वर्षे झाली - अजून तीच वापरतोय. विनाकारण गरजा निर्माण करायच्या नाहीत, असं आयुष्य जगतोय. बाकी मग आईवडिलांना फुरसुंगीजवळ एका छोट्या प्लॉटवर एक छोटं घर घेऊन दिलंय. मोठ्या भावाला, जो शिकला नव्हता, त्याला एक ट्रक घेऊन दिलाय. वडील आता घरीच असतात. आई अजूनही कामाला जाते. त्या दोन कुटुंबांनी इतकी वर्षं घर चालवायला मदत केली, होईल तोपर्यंत तिथे काम करत राहायचं ठरवलंय. बायको व मुलीला घेऊन वर्षातून एक-दोन वेळा फिरायला जातो. मध्ये एकदा अमेरिकेची व एकदा इंग्लंडची ऑनसाईटची ऑफर होती, त्याने नकार दिला. भारत सोडायचा नाही म्हणून.
जेव्हा जेव्हा मला एखाद्या गोष्टीसाठी पैसे कमी पडताहेत असं वाटतं, तेव्हा मी ‘क्षने काय केलं असतं?’ याचा विचार करतो.