
नमस्कार वाचक मित्रहो,
श्रीगणेशचतुर्थीचा योग साधून दर वर्षीप्रमाणे श्रीगणेश लेखमाला आपल्यासमोर सादर होत आहे. इतर अनेक उपक्रमांप्रमाणेच ही लेखमाला मिपाचे खास वैशिष्ट्य ठरत आली आहे.
तरी आवाहनास मान देऊन आवर्जून लेखन पाठविणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. वाचकांनी लेखमालेचा आस्वाद घ्यावा आणि आपले अभिप्राय नोंदवावेत ही विनंती.
लेखमालेचा या वर्षीचा विषय आहे, 'माझा मी जन्मलो फिरुनी.'
प्रस्तुत विषय जेव्हा आवाहन धाग्यात मांडण्यात आला, तेव्हा अनेकांनी त्याबद्दल शंका व्यक्त केली, विषयाच्या सयुक्तिकतेबद्दल संदेह मांडण्यात आले. काहींना हा विषय अहंमन्यता, मीपणा, आत्मस्तुती या गोष्टींना खतपाणी घालणारा वाटला. हे सर्व समज की गैरसमज ते लेख पाहून लक्षात येईलच, तसेच वरील विषयातून नक्की कशा प्रकारचे साहित्य अपेक्षित होते ते लेखमालेतील लेख सोदाहरण स्पष्ट करतील अशी आशा आहे.
जुन्या गोष्टी, आचार-विचार, विकार, रिती, पद्धती, अप्रासंगिक ते सर्व मागे सोडून नव्या विचारसरणीचा अंगीकार, तसेच आयुष्यात कुठल्याही प्रकारे केलेला सकारात्मक बदल म्हणजेही नव्याने जन्म. दर वेळी आयुष्य बदलण्यास एखादी मोठी घटना, कलाटणी कारणीभूत असेल असे नाही. ज्या क्षणी माणूस त्याच्या आताच्या जगण्यास सुसंगत नसलेल्या गोष्टींचा त्याग करून उपयुक्त गोष्टींचा स्वीकार करत पुढे जातो, तोच त्याचा पुनर्जन्म म्हणता येईल.
पाच वर्षांपूर्वी आपण कसे होतो, तेव्हाचे आपण आणि आताचे आपण यात किती फरक आहे, असा विचार केला तरी आपल्याला कळून येईल, आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आपल्यात अनेक प्रकारे बदल होत जातात, जुने विचार बदलत जाऊन त्यांची जागा नवीन विचार घेतात, राहणीमान, जीवनशैली यातही बदल होत राहतात. या सर्वांतून एक नवीन 'मी' दर क्षणी घडत असतो आणि तसा तो घडलाही पाहिजे, कारण बदल हा आयुष्यातील एकमेव स्थायिभाव आहे.
फिरून जन्म होणे, चुकांमधून मार्ग काढत पुढे जाणे यातून भव्य-दिव्य असे काही अभिप्रेत नाही. यात कुणा थोर व्यक्तींच्या, सेलिब्रिटीजच्या, ख्यातकीर्त लोकांच्या आयुष्यातील रोचक घटना असाव्यात, कुणी काही जगावेगळे अनुभव, किस्से सांगावेत असेही गरजेचे नाही. अतिसामान्य लोकांच्या आयुष्यातही अशा काही घटना घडतात की त्यांना स्वत:मधील, स्वत:सही जाणीव नसलेले सुप्त गुण बाहेर आणून प्राप्त परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे मार्गक्रमण करावे लागते. अशाच काही अनुभवांचा या वर्षीच्या लेखमालेत समावेश आहे.
विषयानुरूप उदाहरणे द्यायची, तर कुणी असाध्य आजारावर, अपघातावर मात करतो, कुणी नोकरीतील चाकोरीबद्ध साचलेपणातून बाहेर पडून नवी वाट चोखाळू पाहतो. कुणी स्त्री आलेल्या संकटांवर, परिस्थितीवर मात करत स्वयंसिद्ध बनू पाहते. कुणी गरिबीचे चटके सोसून स्वकष्टाने एक संपन्न आयुष्य घडवितो, कुणी परिस्थितीची जाण ठेवून समाजाला आपण काही देणे लागतो याचे भान ठेवत हे देणे कुठल्याही स्वरूपात फेडू पाहतो. अशा अनेक उदाहरणांतून 'फिरुनी जन्मणे' हा लेखमालेचा विषय योग्य प्रकारे स्पष्ट होईल असे वाटते.
प्रत्येक व्यक्ती ही सामान्यच असते; मात्र काही वेळा अशा येतात, जेव्हा त्या व्यक्तीला ठरावीक चौकटीतून बाहेर पडून, आपल्यातील ताकद, क्षमता पूर्णपणे वापरून वेगळ्या वाटा निवडून त्यावरून चालावे लागते. हीच ती वेळ असते जेव्हा त्या सामान्यांतील असामान्यत्व ठळकपणे दिसून येते आणि त्यांच्याबरोबर इतरांचेही आयुष्य उजळून टाकते.
असेच काही सामान्यांतील असामान्यत्व दाखविणारे अनुभव आपल्यासमोर ठेवण्यास आम्हांस अत्यधिक आनंद होत आहे. तरी सर्वांनी लेखमालेचा आस्वाद घ्यावा आणि आपले अभिप्राय अवश्य नोंदवावेत, ही पुन्हा एकदा विनंती.
चला तर मग, जयदीप साहनींच्या या अत्यंत सुंदर आणि प्रभावी शब्दांसह लेखमालेचा श्रीगणेशा करूया.
उलझे नहीं तो कैसे सुलझोगे,
बिखरे नहीं तो कैसे निखरोगे,
उड़ने दो..
हवा ज़रा सी लगने दो,
सोया था अब जगने दो,
पंखों को हवा ज़रा सी लगने दो..
अनुक्रमणिका
श्रीगणेश लेखमाला भाग १: माझा मी जन्मलो फिरुनी!
लेखक : माम्लेदारचा पन्खा
श्रीगणेश लेखमाला भाग २: क्ष
लेखक : पैलवान
श्रीगणेश लेखमाला भाग ३: फोडणी पहावी टाकून, अर्थात 'संगीत गोईंग डच'
लेखक : आदूबाळ
श्रीगणेश लेखमाला भाग ४: एका अनोळखी जगातला प्रवास.
लेखक : अनिवासि
श्रीगणेश लेखमाला भाग ५: माझी मी जन्मले फिरुनी.
लेखिका : ज्योति अलवनि
श्रीगणेश लेखमाला भाग ६: माझा मी जन्मलो फिरुनी.
लेखक : Kishan Vasekar
श्रीगणेश लेखमाला भाग ७: कुण्या देशीचे पाखरू
लेखिका : Naval
श्रीगणेश लेखमाला भाग ८: दिव्यत्वाची प्रचिती
लेखक : बाजीप्रभू