बाप्पाचा नैवेद्यः प्रकाशची बर्फी
प्रकाशची बर्फी
दादरच्या प्रकाशमध्ये पूर्वी ही पांढरी शुभ्र ,वर फक्त चारोळी घातलेली बर्फी मिळत असे .आता दूर राहायला गेल्यापासून प्रकाशमध्ये वारंवार जाणे जमत नाही, आणि गेलो, तरी आता ती बर्फी मिळत नाही, एकतर थोडीशी काळपट दिसते, शिवाय वर पिस्ता कप लावलेले असतात.
म्हणून म्हटलं, करून पाहू. गुगलबाबाच्या कृपेने निशामधुलिका यांची कृती मिळाली, नेहमीसारखा पाक करून खवा घालून आटवा, अशी कृती नव्हती म्हणून खूप बरे वाटले. कारण अशाप्रकारे केलेल्या कृतीमध्ये,''आधी हाताला चटके, तेव्हा मिळते बर्फी'' असा प्रकार होतो.
ती कृती पूर्ण झाल्यावर लक्षात आलं, अरे, ही तर पूर्वी प्रकाशमध्ये मिळत असलेल्या बर्फीसारखीच दिसतेय, खाऊन पाहिल्यावर तर खात्रीच पटली, यंदा बाप्पासाठी पण ही बर्फी करायची ठरवली आहे. तेवढेच त्यालापण जुन्या आठवणीतील बर्फी मिळाल्याचे समाधान. अतिशय सोपी आणि चटकन होणारी ही कृती मिपाकरांसाठी देत आहे.
साहित्यः
२५० ग्राम खवा
१२५ ग्राम साखर
चारोळ्या
कृती:
२५० ग्राम खवा किसून थोडासा भाजून घ्यावा. १२५ ग्राम साखरेचा पक्का पाक करून गॅस बंद करावा, आणि पाक तसाच ढवळत राहावे पुन्हा त्याची साखर होईपर्यंत. (ही क्रिया भराभर करावी लागते, कारण पाक पक्का असल्याने साखर होण्याची क्रिया लवकर होते. मध्यच खडेपण बनू शकतात, तसे झाले तर साखर मिक्सरमधून काढावी.)
या साखरेला बुरा साखर म्हणतात. दोन्ही वस्तू पूर्ण थंड होऊ द्यावया. आणि मग एकत्र कराव्यात, व्यवस्थित मिक्स करून तूप लावलेल्या ट्रेमध्ये बर्फी थापावी. वर चारोळी दाबून, थोड्या वेळाने सुरीने काप द्यावेत.. साधारण ८ ते ९ तासांनी बर्फी सेट होते
