नारळीभात

लोकहो, आपला नारळीपौर्णिमेचा खास मेनू केला आज. त्यामुळे आता वाचा आणि पहाही तोच. तुमच्याही घरी तोच असेल म्हणा :)

वाढणी: ४ व्यक्तींसाठी

साहित्यः १ वाटी बासमती तांदूळ, १ वाटी खोवलेला नारळ, १.५ वाटी चिरलेला गूळ, ६-७ लवंगा, पाव वाटी बेदाणे, काजू, बदाम आवडीनुसार, वेलदोडा पूड १ टीस्पून, साजूक तूप एक टेबलस्पून, पाणी २-३ वाट्या (तांदळाच्या प्रतीनुसार कमी जास्त लागू शकते.), केशराच्या ८-१० काड्या आणि केशर भिजवायला पाव वाटी दूध.

कृती: तांदूळ स्वच्छ धुवून एका रोवळीत १ तास उपसून ठेवावेत. केशर किंचित गरम करून (गरम तव्याचर गॅस बंद करून केशर तव्यावर घालून लगेच काढून कोमट दुधात किंचित चुरून घालायचे. तव्यावर ठेवायचे नाही. लगेच करपते. )

एकीकडे ३ वाट्या पाणी तापवायला ठेवावे आणि दुसर्‍या बाजूला तूप तापवावे. त्यात पहिल्यांदा काजू, बदाम, बेदाणे तळून घ्यावेत आणि बाजूला काढून ठेवावेत. त्याच तुपात लवंगा घालाव्यात आणि धुतलेले तांदूळ घालून छान परतून घ्यावेत. त्यात आधणाचे पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. एका ताटात तो भातही काढून घ्यावा. त्याच पातेल्यात चिरलेला गूळ आणि खोबरे एकत्र करून गूळ वितळेतो म्हणजे १-२ मिनिटे शिजवावे, त्यात वेलदोडा पूड घालून काजू, बदाम, बेदाणे घालून शिजवलेला भात हलकेच मिक्स करावा, केशर घातलेले दूध घालावे आणि मंदाग्नीवर पाच मिनिटे झाकून वाफ आणावी. नारळीभात तयार आहे.

.